फेसबुक पोस्टमुळे निर्माण झालेल्या वादानंतर राष्ट्रीय जनता दलाचे (आरजेडी) सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव यांनी पुत्र तेज प्रताप (Tej Pratap Yadav) यांची पक्षातून हकालपट्टी केली. या कारवाईनंतर एक आठवडा मौन बाळगलेल्या तेज प्रताप यांनी आई-वडिलांसाठी एक भावनिक पोस्ट केली आहे. काही लोभी व्यक्तींनी आपल्याविरुद्ध राजकारण केले आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे.
राजद प्रमुख लालू प्रसाद यादव यांचे मोठे पुत्र तेज प्रताप यादव यांनी रविवारी त्यांच्या वडिलांसाठी आणि आईसाठी एक भावनिक पोस्ट पोस्ट केली. 'एक्स' वर केलेल्या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, "प्रिय मम्मी-पापा... माझे संपूर्ण जग तुमच्या दोघांमध्येच आहे. तुम्ही आणि तुम्ही दिलेला कोणताही आदेश देवापेक्षा मोठा आहे. तुम्ही माझ्याचे सर्वस्व आहात. मला फक्त तुमचा विश्वास आणि प्रेम हवे आहे आणि दुसरे काही नाही. र तुम्ही तिथे नसता तर ना हा पक्ष तिथे असता ना जयचंदसारखे काही लोभी लोक जे माझ्यासोबत राजकारण करतात. फक्त मम्मी-पापा, तुम्ही दोघेही नेहमी निरोगी आणि आनंदी राहा.
२५ मे २०२५ रोजी माजी मंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे आमदार तेज प्रताप यादव यांची राष्ट्रीय जनता दलातून हकालपट्टी करण्यात आली. तेज प्रताप यांना सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबित करण्यात आले. यापुढे तेज प्रताप यादव यांचा पक्षाबरोबर कुटुंबाशीही कोणताही संबंध नसल्याचे लालू प्रसाद यादव यांनी स्पष्ट केले होते. त्यांनी 'एक्स'वर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं होते की, वैयक्तिक जीवनात नैतिक मूल्यांचा अनादर केल्याने सामाजिक न्यायासाठीचा आपला सामूहिक संघर्ष कमकुवत होतो. मोठ्या मुलाचे उपक्रम, सार्वजनिक वर्तन आणि बेजबाबदार वर्तन हे आपल्या कौटुंबिक मूल्यांना आणि संस्कारांना अनुसरून नाही. त्यामुळे वरील परिस्थितीमुळे मी त्यांना पक्ष आणि कुटुंबापासून दूर ठेवतो. आतापासून पक्ष आणि कुटुंबात त्यांची कोणत्याही प्रकारची भूमिका राहणार नाही. त्यांना सहा वर्षांसाठी पक्षातून काढून टाकण्यात आले आहे.'
२४ मे २०२५ रोजी तेज प्रताप यादव यांनी त्यांच्या अधिकृत फेसबुक अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली होती. पोस्टमध्ये तेज प्रताप यादव यांच्यासोबत एका तरुणी होती. आम्ही दोघेही गेल्या १२ वर्षांपासून एकमेकांना ओळखतो. आम्ही एकमेकांवर प्रेम करतो. गेल्या १२ वर्षांपासून आम्ही रिलेशनशिपमध्ये आहोत. मला खूप दिवसांपासून हे तुम्हा सर्वांना सांगायचे होते पण ते कसे बोलावे हे समजत नव्हते....? म्हणून आज या पोस्टद्वारे मी माझे मन तुम्हा सर्वांना सांगतोय! मी काय म्हणतोय ते तुम्हाला समजेल अशी आशा आहे, असे तेज प्रताप यादव यांनी म्हटलं होते. या पोस्टवरुन खळबळ माजल्यानंतर तेज प्रताप यादव यांच्या अकाउंटवरूनच ती डिलीट करण्यात आली. मात्र काहींनी या पोस्टचे स्क्रीनशॉट सेव्ह केले होते. या पोस्टचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला. यानंतर लालूप्रसाद यादव यांनी त्यांची पक्षातून हकालपट्टी केली. त्याचबरोबर माझ्या कुटुंबीयांशीही त्याचा कोणताही संबंध राहणार नसल्याचे स्पष्ट केले होते.
तेज प्रताप यांनी 'एक्स' वर अकाउंट हॅक झाल्याचा दावा केला होता. 'माझे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म हॅक करण्यात आले. माझे फोटो चुकीच्या पद्धतीने एडिट करण्यात आले. माझ्या कुटुंबातील सदस्यांना त्रास दिला जात आहे. बदनाम केले जात आहे. मी माझ्या हितचिंतकांना सावधगिरी बाळगण्याचे आणि कोणत्याही अफवांकडे लक्ष न देण्याचे आवाहन करतो.' असेही त्यांनी म्हटले होते.