इस्लामाबाद ः वृत्तसंस्था
भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’ आणि ड्रोन हल्ल्यांनंतर अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्यासह छोटा शकील आणि मुन्ना झिंगडा हे तिघेही गर्भगळीत झाले असून, त्यांना पाकिस्तानने सुरक्षित ठिकाणी हलवल्याची माहिती समोर आली आहे. विशेषतः, जैश-ए-मोहम्मदचे मुख्यालय भारताने उडवून दिल्यानंतर दाऊद इब्राहिम बिथरला आहे.
‘ऑपरेशन सिंदूर’ राबवत भारताने हल्ला केल्यानंतर भारतीय सुरक्षा यंत्रणा पाकिस्तानवर बारीक लक्ष ठेवून आहेत. याचदरम्यान, दाऊद इब्राहिम भारताच्या हल्ल्यामुळे भेदरला आहे. अट्टल गुन्हेगार छोटा शकील आणि मुन्ना झिंगडा हेही दाऊदसोबत आहेत. हे तिघेजण पाकिस्तान सोडून इतर देशात पळून गेल्याचीही शक्यता वर्तविली जात आहे. भारतीय संरक्षण यंत्रणा या माहितीची पडताळणी करत आहेत. कारण, बर्याचदा दिशाभूल करण्यासाठी अशी माहिती हेतूपूर्वक पेरली जात असते.
कराचीतील क्लिफ्टन या उच्चभू्रंच्या वसाहतीत दाऊद गेल्या अनेक वर्षांपासून वास्तव्याला आहे. त्याला ‘आयएसआय’ या पाकिस्तानच्या लष्करी गुप्तचर संस्थेने संरक्षण कवच पुरविल्याचे सांगितले जाते. मात्र, भारताच्या लष्करी कारवाईमुळे तो आपल्या साथीदारांसह जीव वाचवण्यासाठी एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी गेला आहे. त्याने कराचीतून पळ काढला आहे. त्याला कराचीतून बाहेर काढण्यामागे ‘आयएसआय’ असल्याची चर्चा आहे. त्याला पाकिस्तानमध्येच दुसर्या सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आल्याची माहितीही सूत्रांकडून मिळत आहे.
दाऊदचा संपूर्ण परिवार या हल्ल्यामुळे बिथरला आहे. त्यात पत्नी महजबीन, मुलगा मोईन, त्याचा छोटा भाऊ अनिस इब्राहिम, दाऊदचा जवळचा साथीदार छोटा शकील आणि खास शूटर मुन्ना झिंगडा अशा सर्वांचा समावेश आहे. याच मुन्नाने छोटा राजनवर बँकॉकमध्ये हल्ला केला होता. भारताच्या कारवाईमुळे दाऊदच्या पायाखालील वाळू सरकली असून, तो सैरभैर झाला आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या आणखी एका माहितीनुसार, दाऊद, छोटा शकील आणि मुन्ना झिंगडा हे पाकिस्तान सोडून परदेशात पळून गेले आहेत. भारतीय सैन्य दलाकडून केल्या जात असलेल्या कारवाईत आपलाही गेम होऊ शकतो, या भीतीमुळे हे तिघेही भेकडासारखे अन्यत्र पळून गेले आहेत.