पुढारी ऑनलाईन डेस्क : प्रेमात अडथळा ठरणाऱ्या जन्मदात्या बापाची मुलीने प्रियकरासोबत कट रचून कुऱ्हाडीचे घाव घालून हत्या केल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशात उघडकीस आली. ही घटना उत्तर प्रदेशातील देवरिया जिल्ह्यातील महुआबारी गावात मंगळवारी (दि.५) रात्री घडली. उदयभान यादव (वय ६५) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी मुलगी दीपाली यादवसह तिचा प्रियकर विशाल कुमार गोंडशी याला गुरूवारी (दि.६) अटक केली. (Uttar Pradesh Crime News)
याबाबत अधिक माहिती अशी, महुआबारी गावातील उदयभान यादव हे मंगळवारी (दि.५) रात्री त्यांच्या खोलीत रक्ताच्या थारोळ्यात पडलेले नातेवाईकांच्या निदर्शनास आले. त्यानंतर नातेवाईकांनी त्यांना बेशुद्ध अवस्थेत रुग्णालयात नेले, मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. यानंतर पोलिसांनी याप्रकरणाची चौकशी केली असता मृताची मुलगी दीपाली यादवने पोलिसांना सांगितले की, तिच्या वडिलांची हत्या पूर्ववैमनस्यातून झाली आहे. यामध्ये गावातील चार लोकांचा सहभाग आहे. यावरून नातेवाईकांनी गावातील त्या लोकांविरुद्ध तक्रारदेखील दाखल केली. (Uttar Pradesh Crime News)
मात्र पोलिसांनी या घटनेची सखोल चौकशी करत वेगळेच सत्य बाहेर आणले. पित्याच्या हत्येबाबत दिपालीने पोलिसांना सांगितलेल्या घटनेबाबत पोलिसांना संशय आला. तसेच दिपालीचे एका तरूणाबरोबर प्रेमप्रकरण असल्याचीही माहिती पोलिसांना मिळाली. त्याआधारे पोलिसांनी तिला ताब्यात घेऊन तिची कसून चौकशी केली असता तिने विशाल कुमार गोंडशी या तरूणाशी आपले प्रेमसंबंध होते. दोघांनाही लग्न करायचे होते, मात्र याला वडिलांचा विरोध होता. प्रेमात वडिलांचा अडथळा ठरत असल्याने प्रियकराच्या मदतीने आपणच वडिलांची हत्या केल्याची कबुली तिने पोलिसांना दिली.