नवी दिल्ली; वृत्तसंस्था : दुधाची पिशवी, दह्याचा डबा किंवा पनीरचे पॅकेट विकत घेताना पदार्थांच्या वेष्टनावर नवीन चिन्ह दिसू शकेल. फूड सेफ्टी अँड स्टँडर्डस् ॲथॉरिटी ऑफ इंडिया (एफएसएसएआय) ने १ जुलै २०२८ पासून सर्व दूध आणि दुग्धजन्य पदार्थांवर (मिश्र दुग्धजन्य पदार्थांसह) निळ्या आणि पांढऱ्या रंगाचे एक प्रमाणित थेंबाचे चिन्ह बंधनकारक केले आहे.
दूध व दुग्धजन्य पदार्थांच्या ओळखीबद्दल समज मिळावी, यासाठी नवीन नियम आणल्याचे सांगितले जात आहे. दूध, दही आणि पनीर उत्पादनांसाठी नवीन चिन्हाचे राजपत्र ९ नोव्हेंबरला प्रकाशित करण्यात आले आहे. फूड सेफ्टी अँड स्टँडर्डस् (लेबलिंग अँड डिस्प्ले) रेग्युलेशन्स, २०२० मध्ये सुधारणा करण्यात आली आहे.
पांढऱ्या थेंबाचा आकारही निश्चित
निळ्या चौकोनातील सर्वात लहान ६ मि.मी. लोगोसाठी थेंबाची उंची किमान ४.५६ मि.मी. आणि रुंदी ३ मि.मी. असणे आवश्यक आहे. तर, ८ मि.मी. लोगोसाठी ही किमान ६.०८ मि.मी. उंची आणि ४ मि.मी. रुंदी असेल. तर, १२ मि.मी. लोगोसाठी ९.१२ मि.मी. बाय ६ मि.मी., तर १६ मि.मी. लोगोसाठी १२.१६ मि.मी. बाय ८ मि.मी. थेंबाचा आकार असेल.
नवीन दूध चिन्ह कसे?
पॅकेजिंगचा मुख्य प्रदर्शन भाग १०० चौ.सेें.मी.पर्यंत असल्यास ६ मि.मी.चे चौरस असेल. तर, पॅकेजिंगचा मुख्य भाग १०० चौ.सें.मी.पेक्षा जास्त आणि ५०० चौ.सें.मी.पर्यंत आहे. त्यांच्यासाठी ८ मि.मी. आकार राहील. तर, ५०० चौ.सें.मी.पेक्षा जास्त आणि २,५०० चौ.सें.मी.पर्यंतच्या पॅनेलसाठी १२ मि.मी.चा आकार असेल. याशिवाय, २,५०० चौ.सें.मी.पेक्षा जास्त आकाराच्या पॅनेलसाठी १६ मि.मी.चा आकार निश्चित करण्यात आला आहे.