नवी दिल्ली : कधी पुस्तकांच्या पानात तर कधी टीव्हीवर तर कधी चित्रात पाहिलेला लाल किल्ला, ताजमहाल आदिवासी पाड्यावरील विद्यार्थी प्रत्यक्ष पाहिला. नुसता तो पाहिला नाही तर त्याच्या परिसरात हुंदडत, बागडत, त्याची माहिती घेत, त्यासोबत फोटो काढत तो अनुभवलाही. आदिवासी विकास विभागाचे नाशिक आयुक्त कार्यालय व दैनिक ‘पुढारी टॅलेंट सर्च’ परीक्षा अभियानामुळे नाशिक, धुळे, नंदुरबार व राजूर या विभागांतील विद्यार्थ्यांना मिळाली. या दिल्ली दौर्याने हे विद्यार्थी हरकून गेले होते.
या परीक्षेतील गुणवत्ता यादीत आलेल्या 24 विद्यार्थ्यांची राष्ट्रपतींशी भेट घडवली. राष्ट्रपतींच्या भेटीसह दिल्ली, आग्रा व मथुरा येथील प्रेक्षणीय स्थळांची विद्यार्थ्यांना सफर घडवली. दैनिक ‘पुढारी’च्या माध्यमातून या सर्व मुलांना तीन दिवस दिल्लीतील पंचतारांकित हॉटेलमध्ये राहण्याचा, अनुभव घेता आला. या सहलीत विद्यार्थ्यांनी ताजमहलला भेट दिली. औरंगजेबाच्या हातावर तुरी देऊन महाराष्ट्रात परत आलेल्या युगपुरुष छत्रपतींच्या पराक्रमाची साक्ष देणार्या लाल किल्ल्यालाही विद्यार्थ्यांनी भेट दिली. यावेळी किल्ल्यासमोरचा छत्रपती शिवरायांचा पुतळा पाहून विद्यार्थ्यांच्या अंगावर रोमांच उभे राहिले. विद्यार्थ्यांनी सायंकाळी मथुरा येथील श्रीकृष्ण जन्मस्थळाला भेट दिली.
दिल्लीत कुतुबमिनार, इंडिया गेट, अमर जवान स्मारक, राष्ट्रपिता महात्मा गांधी समाधिस्थळ, लाल किल्ला या ठिकाणीही या मुलांनी भेट दिली. दिल्लीतील प्रसिद्ध चांदणी चौक येथील बाजारपेठेतही मुलांनी सैरसपाटा केला. मॅकडोनाल्ड या पिझ्झा हाऊसमध्ये या सर्व मुलांना पिझ्झा बर्गर व कोक याची चव चाखण्याची संधीही ‘पुढारी’ने उपलब्ध करून दिली होती. त्याची चव चाखत, चमकत्या काचेतून आपले नवे विश्व पाहताना, ही सर्व मुले ‘पुढारी’च्या माध्यातून घडलेल्या या सहलीने तृप्त झाल्याचे दिसत होते.