भुवनेश्वर; वृत्तसंस्था : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले ‘अक्वान’ चक्रीवादळ शुक्रवारी (दि. २०) सकाळी ओडिशातील गोपाळपूरजवळ किनारपट्टीवर धडकले. सुदैवाने या वादळामुळे राज्यात कोणतीही मोठी वित्तहानी किंवा जीवितहानी झाली नसल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापनमंत्री सुरेश पुजारी यांनी दिली आहे. मात्र, वादळाच्या प्रभावामुळे राज्याच्या अनेक भागांत मुसळधार पाऊस कोसळत आहे.
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी ८ वाजता चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकण्याची प्रक्रिया सुरू झाली आणि सकाळी ११.२० वाजेपर्यंत ती पूर्ण झाली. दक्षिण ओडिशा आणि उत्तर आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर गोपाळपूरजवळ हे वादळ धडकले, तेव्हा वाऱ्यांचा वेग ताशी ७० ते ८० किलोमीटर होता, तर वाऱ्यांचे झोत ताशी ९० किलोमीटरपर्यंत पोहोचले होते. दुपारी १ वाजताच्या बुलेटिननुसार, वादळाची तीव्रता कमी होऊन त्याचे रूपांतर तीव्र कमी दाबाच्या पट्ट्यात झाले.
* गोपाळपूरजवळ चक्रीवादळाने किनारपट्टी ओलांडली; ताशी ९० कि.मी. वेगाने वारे
* राज्यातील १४ जिल्ह्यांना अतिवृष्टीचा ‘ऑरेंज अलर्ट’, मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा
* सुरक्षेच्या कारणास्तव पूर्व किनारपट्टी आणि दक्षिण पूर्व रेल्वेच्या ६९ गाड्या रद्द
* पर्यटकांना किनारपट्टी भागात बंदी; गुंडीचा मंदिरासह प्रमुख उद्याने आणि अभयारण्ये बंद