नवी दिल्ली : सायबर गुन्ह्यांमध्ये २०२२ ते २०२४ दरम्यान तिप्पट वाढ झाली आहे. यातून होणाऱ्या फसवणुकीच्या रकमेत २१ पट वाढ झाल्याची आकडेवारी केंद्रीय गृह मंत्रालयाने बुधवारी राज्यसभेत सादर केली. सायबर क्राइम कोऑर्डिनेशन सेंटर (आय ४ सी) ने डिजिटल अरेस्ट प्रकरणांमध्ये सहभागी असलेल्या ३ हजार ९६२ हून अधिक स्काईप आयडी आणि ८३ हजार ६६८ व्हॉट्सअॅप अकाउंटची ओळख पटवून त्यांना ब्लॉक केले आहे. द्रमुकचे खासदार तिरुची शिवा यांनी विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात गृह राज्यमंत्री संजय बंदी कुमार यांनी ही लेखी माहिती दिली.
गेल्या तीन वर्षांत राष्ट्रीय सायबर गुन्हे अहवाल पोर्टल (एनसीआरपी) वर नोंदवलेल्या डिजिटल अरेस्ट आणि संबंधित सायबर गुन्ह्यांचा डेटा केंद्रीय गृह राज्यमंत्र्यांनी राज्यसभेत सादर केला. ज्यामध्ये २०२२ मध्ये अशा ३९ हजार ९२५ घटना नोंदवल्या गेल्या आहेत. ज्यांची एकूण फसवणूक ९१.१४ कोटी रुपये आहे. २०२४ मध्ये, अशा प्रकरणांची संख्या जवळजवळ तिप्पट होऊन १ लाख २३ हजार ६७२ झाली आहे. ज्यामध्ये पोर्टलवर नोंदवलेली एकूण फसवणूकीची रक्कम तब्बल २१ पट वाढून १९,३५.५१ कोटी रुपये झाली आहे, असे आकडेवारीवरून दिसून आले आहे. आकडेवारीनुसार, २०२५ च्या दोन महिन्यांत, २८ फेब्रुवारीपर्यंत एकूण २१०.२१ कोटी रुपयांच्या फसवणुकीची १७,७१८ प्रकरणे नोंदवली गेली आहेत.
संजय बंदी कुमार म्हणाले की, सायबर गुन्हेगारांनी ईडी, सीबीआय सारख्या तपास संस्थाचे अधिकारी असल्याचे भासवून फसवणूक करण्यासाठी या खात्यांचा वापर केला. याशिवाय, २८ फेब्रुवारी २०२५ पर्यंत ७.८१ लाखांहून अधिक सिम कार्ड आणि २.०८ लाखांहून अधिक आयएमईआय क्रमांक ब्लॉक करण्यात आले आहेत. त्याच वेळी, १३.३६ लाखांहून अधिक तक्रारींच्या आधारे, ४३८६ कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे नुकसान टाळता आले, असल्याचे त्यांनी सांगितले.
केंद्र सरकार आणि दूरसंचार सेवा प्रदात्यांनी आंतरराष्ट्रीय स्पूफ कॉल ओळखण्यासाठी आणि ब्लॉक करण्यासाठी एक प्रणाली विकसित केली आहे. जेव्हा असे कॉल येतात तेव्हा मोबाईलवर भारतीय नंबर दिसतो, जरी तो कॉल परदेशातून येत असला तरी. टीएसपींना असे कॉल ब्लॉक करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.