Cyber Crime AI voice : मध्य प्रदेशातील इंदूर शहरातून सायबर फसवणुकीचे एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. सायबर चोरट्यांनी एका महिला शिक्षिकेची फसवणूक केली आहे. इंदूरच्या लसुडिया पोलीस ठाण्याच्या हद्दीत सायबर गुन्हेगारांनी AI (Artificial Intelligence) आणि व्हॉइस मॉड्युलेशन तंत्रज्ञानाचा वापर करून शिक्षिकेच्या बँक खात्यातून पैसे लंपास केले असल्याचे स्पष्ट झाले आहे.
आवाज बदलण्याच्या या तंत्रज्ञानाला 'AI व्हॉइस क्लोनिंग' असे म्हणतात. इंटरनेटवर सध्या अशी अनेक साधने उपलब्ध आहेत, एका आवाजाला दुसऱ्या आवाजात हुबेहूब बदलू शकतात. आतापर्यंत अनेक लोक या तंत्रज्ञानाचे बळी ठरले आहेत. सायबर चोरटे तुमच्या भाऊ, बहीण, आई-वडील किंवा जवळच्या नातेवाईकांचा आवाज AI द्वारे तयार करतात आणि त्यानंतर 'इमर्जन्सी' असल्याचे सांगून पैशांची मागणी करतात.
रिपोर्टनुसार, सायबर भामट्याने AI व्हॉइस क्लोनिंग तंत्रज्ञानाचा वापर करून महिला शिक्षिकेला फोन केला. समोरच्या व्यक्तीने आवाज बदलून हुबेहूब तिच्या भावाच्या आवाजात संवाद साधला. यामुळे महिलेला कोणताही संशय आला नाही. सायबर ठगाने एका मित्राला मदतीची गरज असल्याचे भासवले. त्यानंतर त्याने महिलेकडे पैशांची मागणी केली. आपल्या भावालाच गरज आहे, असे समजून महिलेने समोरच्या व्यक्तीने दिलेल्या बँक खात्यात १ लाख रुपये तत्काळ, ट्रान्सफर केले.
काही काळानंतर जेव्हा महिलेने आपला भावाला फोन केला. तेव्हा भावाने पैशासाठी फोन केला नसल्याचे सांगितले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिला शिक्षिकेने तत्काळ पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली.पोलीस प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
अनोळखी नंबरवरून फोन आल्यास आणि समोरची व्यक्ती ओळखीचा आवाज काढून पैशांची मागणी करत असल्यास, खात्री केल्याशिवाय पैसे पाठवू नका.
पैसे पाठवण्यापूर्वी संबंधित व्यक्तीच्या मूळ (ओरिजनल) नंबरवर फोन करून विचारणा करा.
कोणत्याही संशयास्पद कॉलला बळी पडू नका आणि तातडीने सायबर पोलिसांशी संपर्क साधा.