Bakrid 2025 BJP MLA Nandkishor Gurjar statement
गाझियाबाद : मुस्लिम समुदायाच्या लोकांनी बकऱ्याचा बळी देण्याऐवजी त्याच्या आकाराचा केक कापून पर्यावरणपूरक बकरी ईद साजरी करावी, असे आवाहन उत्तर प्रदेशमधील गाझियाबादच्या लोणी येथील भाजपचे आमदार नंदकिशोर गुर्जर यांनी केले आहे. बकरी ईदपूर्वी हिंडन विमानतळाजवळील भागात मांस विक्री दुकाने आणि कत्तलखान्यांवर बंदी घालण्याची मागणी देखील आमदार गुर्जर यांनी पोलीस उपायुक्तांकडे पत्राद्वारे केली आहे.
आमदार नंदकिशोर गुर्जर म्हणाले की, लोणी येथील प्रशासनाने विमान अध्यादेश, पशुधन कायदा १९६० चे पालन करावे आणि गायी किंवा इतर कोणत्याही प्राण्यांची हत्या होणार नाही याची काळजी घ्यावी. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक व्हिडिओ आणि पत्र देखील पोस्ट केले आहे. यामध्ये त्यांनी लिहिले की, 'विमान अध्यादेश लोणी अंतर्गत कायम आहे. या अंतर्गत १० किलोमीटर अंतरावरील कोणतेही कत्तलखाना, मांस दुकाने आणि हॉटेल्स यावर बंदी आहे. अशा दुकानांमुळे पक्षी आकर्षित होतात. याआधी एका विमानाचा त्यामुळे अपघात झाल्याने त्यावर बंदी घालण्यात आली.'
देशात कोरोना आपल्यासमोर आहे. हिंदूंनी नारळ आणि भोपळा यज्ञ म्हणून स्वीकारला आहे. प्राण्यांची हत्या करणे बंद केले आहे. ही बुद्ध, महावीर आणि श्रीकृष्ण यांची भूमी आहे. दूध आणि तुपाच्या नद्या येथे वाहतात, असेही गुर्जर यांनी म्हटले आहे.
लोणीमध्ये मोठ्या प्रमाणात प्राण्यांची कत्तल केली जाऊ शकते, अशी माहिती मिळाली आहे. अशा परिस्थितीत संवेदनशील लोणीचे वातावरण बिघडवण्यासाठी काही लोक गायींची हत्या देखील करू शकतात. मुस्लिम समुदायाच्या बांधवांना पुरोगामी विचारसरणीचा भाग होण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे. पूर्वीप्रमाणेच, लोणीच्या हितासाठी, मुस्लिम समुदायाच्या लोकांनी पर्यावरणपूरक प्रतीकात्मक पद्धतीने बकऱ्याच्या आकाराचा केक कापून शांततेत ईद साजरी करावी.
जिथे हवाई दलाचे तळ आहे तिथे अध्यादेश आहे. जर बकरी ईदच्या नावाखाली प्राण्यांची कत्तल केली गेली तर ती देशद्रोहाची बाब ठरते. गेल्या वर्षी मुस्लिम बांधवांनी केकपासून बकरी बनवून ज्या पद्धतीने पर्यावरणपूरक ईद साजरी केली, त्याच पद्धतीने त्यांनी त्यांचा सण प्रतीकात्मकपणे साजरा करावा. आम्ही सर्व त्यांच्यासोबत आहोत. पण जर कोणत्याही परिस्थितीत तेथे प्राण्यांची कत्तल करण्याचा प्रयत्न केला गेला तर मी पोलिसांना कठोर कारवाई करण्यास सांगितलं आहे. कोणत्याही प्रकारची कत्तल होऊ नये. कोणत्याही परिस्थितीत अध्यादेशाचे पालन केले पाहिजे,' असे गुर्जर यांनी म्हटले आहे.