CUET Topper 2026 Devina Gahlot
नवी दिल्ली: 'राष्ट्रीय परीक्षा एजन्सी'द्वारे घेण्यात आलेल्या सामायिक विद्यापीठ प्रवेश परीक्षा-पदवी (CUET 2026) च्या निकालात दिल्लीतील देविना गहलोत हिने देशात अव्वल क्रमांक पटकावला आहे. दिल्लीचे माजी परिवहन व पर्यावरण मंत्री आणि भाजपचे आमदार कैलाश गहलोत यांची कन्या असलेल्या देविनाने पाच विषयांमध्ये १,२३२.१९ असा सर्वोच्च एकूण NTA स्कोअर मिळवला. विशेष म्हणजे, दिवसरात्र अभ्यास करण्याऐवजी योग्य तयारी, NCERT पुस्तकांवर भर आणि नियमित सराव हेच तिच्या यशाचे प्रमुख सूत्र ठरल्याचे तिने सांगितले.
मंगळवारी एनटीएने CUET 2026 चे निकाल जाहीर केले. देशभरातील केंद्रीय, राज्य आणि खासगी विद्यापीठांमधील पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ही परीक्षा घेतली जाते. यंदाच्या परीक्षेत २२ विद्यार्थ्यांनी त्यांच्या निवडलेल्या तीन विषयांमध्ये १०० टक्के गुण मिळवले, तर १८० विद्यार्थ्यांनी दोन विषयांमध्ये १०० टक्क्यांची कामगिरी केली.
दिल्लीतील देविना गहलोत हिने १,२३२.१९ गुणांसह अव्वल स्थान पटकावले. तिच्यानंतर दिल्लीचा सक्षम गोयल (१,२३०.८२), हिमाचल प्रदेशचा उदित चतुर्वेदी (१,२०७.२१), बिहारचा श्रेयांश मिश्रा (१,२०५.९६) आणि उत्तर प्रदेशची खुशी सबलोक (१,२०३.७८) यांचा क्रमांक लागतो.
CUET ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी देविनाने तीन महत्त्वाचे सल्ले दिले आहेत:
NCERT पुस्तकांवर पूर्ण लक्ष केंद्रित करा
नियमित सराव आणि उजळणी करा
दिवसभर अभ्यास करण्याऐवजी संतुलित दिनचर्या ठेवा आणि आवश्यक तेव्हा विश्रांती घ्या
आपल्या तयारीबद्दल बोलताना देविनाने सांगितले की, यशासाठी दिवसभर पुस्तकांसमोर बसून राहणे आवश्यक नसते. “मी बोर्ड परीक्षांसाठीही मेहनत घेतली आणि CUET साठीही. मात्र दोन्ही परीक्षांच्या तयारीची पद्धत वेगळी होती. CUET मध्ये केवळ पाठांतर करून उपयोग होत नाही. अभ्यासासोबत वेळोवेळी विश्रांती घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे,” असे तिने सांगितले.
CUET ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना सल्ला देताना देविनाने सांगितले की, मूलभूत गोष्टींवर लक्ष केंद्रित करणे पुरेसे असते. “जर बोर्ड परीक्षेची तयारी चांगली झाली असेल, तर CUET फार वेगळी परीक्षा नाही. माझी संपूर्ण तयारी NCERT पुस्तकांवर आधारित होती. मी मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचा भरपूर सराव केला,” असे तिने सांगितले.
स्पर्धा परीक्षांबाबत विद्यार्थ्यांवर असलेल्या मानसिक तणावाबाबतही देविनाने महत्त्वाचा सल्ला दिला. “तणाव कधीच उपयोगी पडत नाही. एकदा का तुम्ही तणाव घेण्यास सुरुवात केली, की तुमचे लक्ष विचलित होते. अनेक वेळा मला देखील अनिश्चितता वाटली, पण त्या विचारांवर मात केल्यानंतर लक्षात आले की आपल्याकडे आवश्यक क्षमता आधीपासूनच असते,” असे ती म्हणाली.
देविनाच्या मते, परीक्षेपूर्वी स्वतःवर अनावश्यक अपेक्षांचे ओझे टाकणे टाळावे. “मी परीक्षा देताना कधीही ऑल इंडिया रँक मिळवायचीच असा विचार केला नाही. फक्त चांगली कामगिरी करून उत्तम निकाल मिळावा, एवढीच अपेक्षा होती. माझ्या पालकांनीही कधी विशिष्ट रँक मिळवण्यासाठी दबाव टाकला नाही,” ती म्हणाली.
यशामध्ये मेहनतीबरोबर नशिबाचाही काही अंश असतो, असे देविनाने सांगितले. “माझे आजोबा नेहमी म्हणायचे की यश हे ९५ टक्के मेहनत आणि ५ टक्के नशीब असते. सुदैवाने माझ्यासाठी ते ५ टक्के नशीबही अनुकूल ठरले आणि परीक्षेत मला परिचित प्रश्न आले,” असे तिने नमूद केले.
NTA च्या माहितीनुसार, या वर्षी CUET साठी १,५६८,८६७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यापैकी ११,६४,०९८ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली. नोंदणी केलेल्या उमेदवारांमध्ये ७,९४,२५७ मुले, ७७४,६०७ मुली आणि ३ तृतीयपंथी उमेदवारांचा समावेश होता; तर परीक्षा दिलेल्या उमेदवारांमध्ये ५,७८,५०० मुले, ५८५,५९६ मुली आणि २ तृतीयपंथी उमेदवारांचा समावेश होता.