जम्मू : अनिल एस. साक्षी
केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) एका जवानाने नुकताच ऑनलाईन व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून पाकिस्तानातील एका तरुणीशी विवाह केल केला आहे. मुनीर अहमद असे त्याचे नाव आहे. तो जम्मूच्या भलवाल येथील राब्ता तालुक्यातील हंदवाल गावचा रहिवासी आहे.
तो सध्या सीआरपीएफच्या ७२ व्या बटालियनमध्ये कार्यरत आहे. तसेच रियासी जिल्ह्यातील शिव खोरी रानसू येथे तैनात आहे. त्याची वधू, मीनल खान ही मोहम्मद असगर खान यांची कन्या असून पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील कोटली फकीर चंद गुजरावाला या सियालकोटनजीकची रहिवासी आहे. प्राप्त माहितीनुसार, मीनल खान ही भारतीय अधिकाऱ्यांकडून १५ दिवसांच्या विशेष प्रवेश परवान्यासह (व्हिसा) काल उशिरा भारतात पोहोचली.
पंजाबमधील वाघा सीमेवर तिच्या सासरच्यांनी तिचे जोरदार स्वागत केले. त्यानंतर तिला हंदवाल गावात तिच्या पतीच्या घरी पोहोचवण्यात आले. दरम्यान, वराच्या कुटुंबानेही या गोष्टीची पुष्टी केली असून मीनलच्या प्रवेशासाठी सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता करून आवश्यक परवानग्या घेतल्याचे म्हटले आहे. पण यासाठी तिला दीर्घ प्रतीक्षा करावी लागली. नऊ महिन्यांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर शुक्रवारी उशिरा मीनल आपल्या सासरी पोहोचली.