पुढारी ऑनलाईन डेस्क : दिल्लीच्या इंदिरा गांधी विमानतळावर एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कॅनडाहून आलेल्या एका प्रवााशाच्या बॅगची तपासणी केली असता. एक अनपेक्षित गोष्ट बाहेर आली. सुरक्षा अधिकाऱ्यांनी जेव्हा प्रवाशांची बॅग तपासणी सुरु केली तेंव्हा त्यात काहीतरी तीक्ष्ण वस्तू हाताला लागली.
अधिकाऱ्यांनी अधिक तपासणी केली असता त्यात एका मगरीच्या पिल्लाची कवटी सापडली. ही कवटी बघून अधिकारीही बुचकळयात पडले. संबधित व्यक्तिला अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले असून त्याचे नाव जाहीर केलेले नाही. ३२ वर्षीय हा युवक कॅनडाहून आला आहे. त्याच्याकडे असलेल्या बॅगेत एका क्रिमी रंगाच्या कपड्यामध्ये मगरीच्या पिलाची कवटी गुंडाळली होती. जवळपास ७७७ ग्रॅम एवढे वजन या कवटीचे आहे. याबाबात कस्टम अधिकाऱ्यांनी एक्सवर माहिती दिली आहे. याबाबतचे वृत्त सिएनएनने दिले आहे.
कस्टम अधिकाऱ्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की भारतात संरक्षीत असणाऱ्या मगरीची ही कवटी आहे. भारतीय वन्यजीव कायद्याचा भंग केल्याचा व कस्टम कायद्याचा भंग केल्याचा ठपका संबधित युवकावर ठेवला आहे. संरक्षित असलेल्या प्राण्याच्या अवयवांची तस्करी करणे हा गुन्हा गंभीर स्वरुपाचा असून आता याबाबात कस्टम ऑफिस व वन्यजीव कार्यालय या दोन्हीच्या संयुक्तरितीने कारवाई केली जाणार आहे. ही मगरीची कवटी आता वन्यजीव कार्यालयाकडे हस्तांतरीत करण्यात आली असून. याची आता तपासणी केली जाणार आहे.
भारतामध्ये २०११ ते २०२० च्या दरम्यान विमानतळावरुन वन्यजीवांच्या अवयवांची तस्करी होण्याच्या १४१ घटना उघडकीस आल्या आहेत. यामध्ये जवळपास १४६ प्रकारच्या वन्यजीवांची तस्करी करण्याचा प्रयत्न झाला होता. कासव, साप, पाली आदींचा यामध्ये समावेश आहे.