पत्नी तुलसीने प्रियकर शोएबसोबत मिळून पती प्रिन्सचा निर्घृण खून केल्‍याचे तपासात स्‍पष्‍ट झाले आहे.  
राष्ट्रीय

Crime News | गटारात सापडली कवटी आणि हाडे! प्रेम, व्यसनाच्या विळखा आणि पतीच्या निर्घृण खुनाची गोष्ट ऐकून पोलिसांनाही फुटला घाम

तब्बल सहा महिन्यांनंतर खुनाचे गूढ उकलले, पत्नीला प्रियकरासह अटक

पुढारी वृत्तसेवा

Shocking Crime News

देवरी (मध्य प्रदेश) : दोघांची ओळख सोशल मीडियावर झाली... चॅटिंग वाढलं तसं प्रेमही फुललं.... तिचे लग्‍न झाल्‍यानंतर दोघे संपर्कात राहिले... त्यानंतर दोघांनी थेट पतीच्‍या हत्येचा भयंकर कट रचला.. अशी धक्कादायक माहिती समोर येत सहा महिन्यांपूर्वी बेपत्ता झालेल्या २२ वर्षीय प्रिन्स वाल्मीकिच्या मृत्यूचे गूढ अखेर उलगडले आहे. प्रियकर शोएबसोबत मिळून पत्नी तुलसीनेच पतीचा काटा काढल्याचे पोलीस तपासात स्‍पष्‍ट झाले आहे. आरोपीच्या घरामागील सेप्टिक टँकमधून कवटी आणि हाडे जप्त करण्यात आली आहेत.

पत्नीने दिली पती बेपत्ता झाल्याची तक्रार

मध्य प्रदेशातील देवरी शहरात २० ऑगस्ट रोजी प्रिन्स वाल्मीकि अचानक बेपत्ता झाला होता. त्याची पत्नी तुलसीनेच स्वतः पोलीस ठाण्यात तो हरवल्याची तक्रार दिली होती. अनेक महिने उलटूनही तपास लागत नसल्याने हे प्रकरण थंड पडले होते, मात्र प्रिन्सच्या कुटुंबाला त्याचा घातपाताचा संशय होता. अखेर तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी नरसिंगपूर येथून शोएब नावाच्या तरुणाला ताब्यात घेतले आणि एका भयानक हत्याकांडाचा खुलासा झाला.

नशेचा विळखा आणि प्रेमाचा त्रिकोण

याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तुलसी आणि शोएब यांचे लग्नापूर्वीपासून प्रेमसंबंध होते. लग्नानंतरही दोघेही संपर्कात होते. तुलसीच्या संपर्कात राहण्यासाठी शोएबने प्रिन्सशी मैत्री केली. तो स्वतः अंमली पदार्थांच्या व्यसनात होता. त्याने प्रिन्सला व्यसनाधीन केले. पती नशेच्या धुंदीत असताना तुलसी आणि शोएब चोरून भेटत असत. मात्र, या संबंधांची कुणकुण प्रिन्सला लागताच घरात वाद सुरू झाले.

अंमली पदार्थ देऊन केली प्रिन्सची हत्या

पोलिस अधिकाऱ्यांनी माध्यमांना सांगितले की, २० ऑगस्टच्या रात्री शोएबने प्रिन्सला अंमली पदार्थ दिले. यानंतर त्याचा निर्घृण खून केला. पुरावा नष्ट करण्यासाठी त्याने आपल्या घरामागील सेप्टिक टँकमध्ये मृतदेह फेकून दिला. त्यावर कचरा टाकला. धक्कादायक बाब म्हणजे, मृतदेह लवकर कुजावा यासाठी आरोपी महिनाभर त्या खड्ड्यात मीठ टाकत असे आणि त्या जागेवर सतत पाळत ठेवून होता.

तब्‍बल सहा महिन्‍यानंतर गुन्हा कसा उघडकीस आला?

हत्येनंतर शोएब आणि तुलसी गुजरातला पळून गेले. तिथले त्यांचे काही व्हिडिओ प्रिन्सच्या कुटुंबापर्यंत पोहोचल्याने संशय बळावला. पोलिसांनी आरोपीला घटनास्थळी नेऊन खोदकाम केले असता ६ महिन्यांपासून गाडलेले सत्य बाहेर आले. सापडलेले अवशेष डीएनए (DNA) चाचणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. प्रियकर शोएबसोबत मिळून पत्नी तुलसीनेच पतीचा काटा काढल्याची धक्कादायक माहिती समोर आल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT