पुढारी ऑनलाईन डेस्क
कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (एम) चे सरचिटणीस सीताराम येचुरी यांच्यावर दिल्लीच्या एम्स रूग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान, त्याची प्रकृती चिंताजनक बनली असून त्यांना एम्समध्ये कृत्रिम श्वासोच्छवास यंत्रणेवर ठेवण्यात आल्याची माहिती सीपीआय (एम) पक्षाने दिली आहे.
७२ वर्षीय येचुरी यांना न्यूमोनियासारखा छातीत संसर्ग झाला होता. तसेच श्वास घेण्यासही त्रास झाल्याने त्यांना १९ ऑगस्ट रोजी ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्समध्ये (AIIMS) दाखल करण्यात आले होते.
श्वसनमार्गात संसर्ग झाल्याने त्यांच्यावर एम्समधील आयसीयूमध्ये उपचार सुरु आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक असून डॉक्टरांचे पथक त्यांच्या प्रकृतीकडे लक्ष ठेवून आहे, असे CPI (M) पक्षाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.
येचुरी १९७४ मध्ये स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (SFI) चे सदस्य बनले. लगेच एका वर्षानंतर त्यांनी कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्क्सवादी) मध्ये प्रवेश केला. जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (JNU) शिकत असताना आणीबाणीच्या काळात त्यांना अटक करण्यात आली होती. त्यांनी १९७७ ते १९८८ दरम्यान तीन वेळा जेएनयू विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष होते. प्रकाश करात यांच्यासह येचुरी यांना जेएनयूमध्ये डाव्या विचारधारेचे अस्तित्व मजबूत करण्याचे श्रेय दिले जाते. त्यांनी पी. चिदंबरम यांच्यासोबत १९९६ मध्ये संयुक्त आघाडी सरकारसाठी समान किमान कार्यक्रमाचा मसुदा तयार केला होता. २००४ मधील संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या स्थापनेत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.