जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीत नॅशनल कॉन्‍फरन्‍स आणि काँग्रेस आघाडीने बहुमताची निर्णायक आघाडी घेतली आहे.  file photo
राष्ट्रीय

जम्मू-काश्मीरमध्ये 'नॅशनल कॉन्‍फरन्‍स-काँग्रेस' आघाडीची सत्ता स्‍थापनेकडे वाटचाल

पुढारी वृत्तसेवा

पुढारी ऑनलाईन डेस्क : जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीत नॅशनल कॉन्‍फरन्‍स आणि काँग्रेस आघाडीने बहुमताची निर्णायक आघाडी घेतली आहे. निवडणूक आयोगाने दुपारी २ वाजण्याच्या सुमारास जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस आघाडीने ९० पैकी ४७ जागांवर आघाडी घेतली होती. भाजपने ११ जागा जिंकल्या असून १८ जागांवर आघाडी होती. तर पीडीपी केवळ ४ जागांवर आघाडीवर होती.

बंडगाम मतदारसंघातून ओमर अब्‍दुल्‍ला विजयी

नॅशनल कॉन्‍फरन्‍स पक्षाचे उपाध्‍यक्ष ओमर अब्‍दुल्‍ला यांनी बडगाम मतदारसंघात पीडीपीचे आगा सय्‍यद मुंतझीर मेहदी यांचा १८ हजारांहून अधिक मतांनी पराभव केला आहे.

नॅशनल कॉन्‍फरन्‍स ३९ जागांवर आघाडीवर

निवडणूक आयोगाने मतमोजणीच्‍या ताज्‍या आकडेवारीनुसार, जम्‍मू -काश्‍मीरमधील ९० जागांपैकी नॅशनल कॉन्‍फरन्‍स ३९, काँग्रेस ८, भाजप २८, पीडीपी ३, जेपीसी २ , सीपीआय(एम) आणि डीपीएपी प्रत्येकी 1 जागेवर तर अपक्ष उमेदवार ८ जागांवर आघाडीवर आहेत.

अफझल गुरूचा भाऊ एजाज सोपोरमधून पराभवाकडे?

सोपोर मतदारसंघातील अपक्ष उमेदवार आणि दहशतवादी अफझल गुरूचा भाऊ एजाज गुरू पिछाडीवर आहे.

'नॅशनल कॉन्‍फरन्‍स-काँग्रेसचे आघाडी सरकार स्‍थापन होणार'

जम्‍मू दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार रमण भल्‍ला म्‍हणतात की, जम्‍मू-काश्‍मीरमध्‍ये नॅशनल कॉन्‍फरन्‍स-काँग्रेसचे आघाडी सरकार स्‍थापन होणार आहे. आम्‍हाला जनतेचे समर्थन मिळणार अशी अपेक्षा होती. राज्‍यातील जनतेने आम्‍हाला बहुमत दिले आहे.

'एनसी' आणि काँग्रेस ४६, भाजप २६ जागांवर आघाडीवर

जम्‍मू-काश्‍मीरमध्‍ये एक तासाच्‍या मतमोजणीनंतर ९० जागांपैकी नॅशनल कॉन्‍फरन्‍स आणि काँग्रेस आघाडी ४६ जागांवर, भाजप २६, पीडीपी ६ व अन्‍य पक्ष ६ जागांवर आघाडीवर आहेत. तर निवडणूक आयाोगाच्‍या माहितीनुसार ६४ जागांपैकी नॅशनल कॉन्‍फरन्‍स ३०, काँग्रेस ६, भाजप १८ तर पीडीपी २ व अन्‍य पक्ष पाच जागांवर आघाडीवर आहेत.

काँग्रेस नेते जम्‍मू-काश्‍मीरला रवाना

जम्‍मू-काश्‍मीरमध्‍ये प्रारंभीच्‍या मतमोजणीत जम्‍मू-काश्‍मीरमध्‍ये नॅशनल कॉन्‍फरन्‍स आणि काँग्रेस आघाडीने निर्णायक आघाडी घेतल्‍याचे चित्र आहे. दरम्‍यान, काँग्रेस नेते चरणजीत सिंह चन्‍नी आणि मुकेश अग्‍निहोत्री जम्‍मू-काश्‍मीरसाठी रवाना झाले आहेत. येथे नॅशनल कॉन्‍फरन्‍सबरोबर सरकार स्‍थापन करण्‍यासाठी चर्चाही सुरु झाली आहे.

जनादेश भाजपविरोधात असेल : ओमर अब्‍दुला

जम्‍मू-काश्‍मीरमध्‍ये नॅशनल कॉन्‍फरन्‍स आणि काँग्रेस आघाडीचा विजय होईल. राज्‍यातील मतदारांचा कौल आज दुपारपर्यंत स्पष्ट होईल. जनादेश भाजपच्या विरोधात असेल, असे नॅशनल कॉन्फरन्सचे उपाध्यक्ष ओमर अब्दुल्ला यांनी सांगितले.

नॅशनल कॉन्‍फरन्‍सचे ओमर अब्‍दुल्‍ला आघाडीवर

नॅशनल कॉन्‍फरन्‍सचे उपाध्‍यक्ष ओमर अब्‍दुल्‍ला हे बडगाम आणि गंदरबल या दोन्‍ही मतदारसंघातून आघाडीवर आहेत.

सत्ता ही कायमस्वरूपी गोष्ट नाही : इंजिनियर रशीद

जम्‍मू-काश्‍मीरमध्‍ये मतमोजणीला प्रारंभ झाला आहे. अवामी इत्तेहाद पार्टीचे अध्यक्ष आणि खासदार, शेख अब्दुल रशीद उर्फ ​​इंजिनियर रशीद यांनी 'एएनआय'शी बोलताना सांगितले की, "सत्ता ही कायमस्वरूपी गोष्ट नाही. जम्मू-काश्मीरच्‍या एका बाजूला पाकिस्तान आहे, तर दुसऱ्या बाजूला चीन आहे. शांघाय परिषदेत काश्मीरच्या शांततेसाठी पडद्याआड काहीतरी चांगले केले पाहिजे. जम्मू आणि काश्मीरमध्ये कोणतेही सरकार स्थापन झाले तरी ते जम्मू-काश्मीर आणि नवी दिल्ली यांच्यातील पुलाचे काम करावे लागेल."

मतमोजणी सुरू

सकाळी ८ वाजता मतमोजणी सुरू झाली असून पुलवामा येथील मतमोजणी केंद्रात सुरक्षा वाढवण्यात आली आहे.जम्मू-काश्मीरमध्ये १८ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर या कालावधीत ३ टप्प्यांत 63.88 टक्के मतदान झाले. २०१४ मध्‍ये झालेल्‍या निवडणुकीत ६५ टक्‍के मतदान झाले होते. नॅशनल कॉन्फरन्स, काँग्रेस, भाजप आणि पीडीपी या प्रमुख पक्षांमध्‍ये प्रमुख लढत आहे.

जम्मू-काश्मीरमधील विधानसभेच्या ९० जागांसाठी आज मतमोजणी होत आहे. जम्मू-काश्मीरमध्ये १८ सप्टेंबर, २५ सप्टेंबर आणि १ ऑक्टोबरला तीन टप्प्यांत मतदान झाले होते. आज सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT