आरक्षणाच्या मुद्यावरून काँग्रेसचा केंद्र सरकारवर हल्लाबोल  Pudhari File photo
राष्ट्रीय

आरक्षणाच्या मुद्यावरून काँग्रेसचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा

आरक्षणाच्या मुद्द्यावरून काँग्रेसने पुन्हा एकदा केंद्र सरकारला धारेवर धरले आहे. सरकार जाणीवपूर्वक आरक्षणविरोधी पावले उचलत असल्याचा आरोप काँग्रेसने केला. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केंद्र सरकारमधील समस्तर प्रवेशाच्या (लॅटरल एन्ट्री) आरक्षणावरून हल्लाबोल केला. तर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी उत्तर प्रदेशातील शिक्षक भरती रद्द झाल्यामुळे सरकारवर हल्लाबोल केला.

भाजप सरकारमुळे ६९ हजार सहाय्यक शिक्षकांची भरती रद्द

राहुल गांधी यांनी ‘एक्स’ वर पोस्ट करत म्हटले आहे की, भाजप सरकार 'अभ्यास' करणाऱ्यांना 'लढायला' भाग पाडत आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाने भाजप सरकारमुळे ६९ हजार सहाय्यक शिक्षकांची भरती रद्द करण्याचा निर्णय दिला. सरकारने आरक्षण व्यवस्थेशी खेळ केल्याचे विरोधी पक्षनेते म्हणाले. त्यामुळे न्यायालयाला हा निर्णय घ्यावा लागला. ते म्हणाले की, न्यायालयाचा हा निर्णय हा केवळ अमित मौर्यसारख्या हजारो तरुणांचा विजय नसून सामाजिक न्यायासाठी लढणाऱ्या प्रत्येक योद्ध्याचा आहे.

आरक्षणापासून दूर ठेवण्याचा भाजपचा प्रयत्न

दुसरीकडे काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की, भाजप सरकारने आरक्षणावर दुहेरी हल्ला चढवला आहे. केंद्रातील सहसचिव, संचालक आणि उपसंचालकांची किमान ४५ पदे समस्तर प्रवेशाद्वारे (लॅटरल एन्ट्री) भरण्यासाठी जाहिरात देण्यात आली असल्याचे ते म्हणाले. सुनियोजित षडयंत्राचा भाग म्हणून भाजप अशाप्रकारे नोकऱ्यांमध्ये जाणीवपूर्वक भरती करत असल्याचा आरोप खर्गे यांनी केला. यामुळे एससी, एसटी, ओबीसी प्रवर्गांना आरक्षणापासून दूर ठेवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. भारतीय राज्यघटनेत समाविष्ट असलेल्या आर्थिक, सामाजिक आणि राजकीय न्यायाच्या तरतुदींची पूर्णपणे अंमलबजावणी करणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT