उमेश कुमार
नवी दिल्ली : ईव्हीएमवर सातत्याने संशय व्यक्त करणाऱ्या विरोधकांना बॅलेट पेपरद्वारे (मतपत्रिका) झालेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीतही मोठा धक्का बसला आहे. पाच राज्यांमधील २८ जागांवर झालेल्या निवडणुकीत प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसचे खातेही उघडू शकले नाही. अगदी कर्नाटकसारख्या राज्यातही काँग्रेसला पराभवाचा सामना करावा लागला. विशेष म्हणजे, येथे काँग्रेसचे बहुमताचे सरकार आहे. या निकालांवर सत्ताधाऱ्यांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही टोला लगावला आहे. मोदी यांनी, ‘२८ पैकी किती जागा जिंकल्या?’ असा सवाल करत त्यांनी उपरोधिक टिपणी केली.
पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर ताशेरे ओढत म्हटले की, या निवडणुका मतपत्रिकांद्वारे (बॅलेट पेपर) घेण्यात आल्या होत्या. उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, बिहार आणि कर्नाटकमधील २८ जागांवर निवडणुका झाल्या. या निवडणुका बॅलेट पेपरच्या माध्यमातून पार पडल्या. अंदाज सांगा काँग्रेसने किती जागा जिंकल्या? असे ते म्हणाले. दुसरीकडे, भाजपनेही काँग्रेसवर निशाणा साधला. ईव्हीएमनंतर आता बॅलेट पेपरवरही निवडणुका पार पडल्या; पण काँग्रेस पक्ष यातही जिंकू शकला नाही. निवडणुका बॅलेट पेपरवर झाल्या पाहिजेत, असे ते आता कोणत्या तोंडाने सांगणार आहेत, असा सवाल भाजपने केला आहे.
मतदार विशेष फेरतपासणी आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात आंदोलन पुकारणाऱ्या काँग्रेससाठी हा निकाल धक्कादायक आहे. काँग्रेससाठी सर्वात मोठी चिंतेची बाब म्हणजे, ज्या राज्यांमध्ये पक्ष सत्तेत आहे किंवा मजबूत असल्याचा दावा करतो, तिथेही त्यांची कामगिरी अपेक्षेनुसार झालेली नाही.
या निकालांमुळे भाजपला विरोधकांवर हल्लाबोल करण्यासाठी नवीन संधी मिळाली आहे. विशेषतः, १ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या विरोधकांच्या महारॅलीपूर्वी आलेल्या या निकालामुळे सत्ताधारी पक्ष अत्यंत खूश आहे.
बॅलेट पेपरद्वारे झालेल्या विधानपरिषद निवडणुकीतील कामगिरीवरून पंतप्रधान मोदी यांनी जोरदार टोला लगावला. ‘उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, बिहार आणि कर्नाटक या चार मोठ्या राज्यांमधील २८ जागांवर विधानपरिषदेच्या निवडणुका पार पडल्या. यात काँग्रेसने किती जागा जिंकल्या, याचा अंदाज लावा?’ असे मोदींनी ‘एक्स’वरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे.
कर्नाटकातील सर्वच्या सर्व चार जागांवर झालेला पराभव विशेषतः पक्ष नेतृत्वासाठी आत्मचिंतनाचा विषय आहे. यामुळे पक्षांतर्गत समन्वय, स्थानिक नेतृत्व आणि निवडणूक व्यवस्थापनातील त्रुटींवर प्रश्नचिन्ह निर्माण होणे स्वाभाविक आहे.