नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याविरोधात काँग्रेस पक्ष २४ डिसेंबर (मंगळवार) रोजी देशव्यापी निदर्शने करणार आहे. पक्षाचे सर्व खासदार आणि काँग्रेस कार्यसमितीचे सदस्य देखील शाह यांच्या वक्तव्याविरोधात २२ आणि २३ डिसेंबरला ठिकठिकाणी पत्रकार परिषदा घेणार आहेत.
संसदेत संविधानावरील चर्चेदरम्यान भाषण करत असताना अमित शहा यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांविषयी केलेल्या वक्तव्यावर काँग्रेस अजूनही आक्रमक आहे. संसदेचे हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर काँग्रेस पक्ष अमित शाह यांच्या विरोधात आता देशव्यापी निदर्शने करणार आहे. काँग्रेसचे संघटना सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी याबाबत माहिती दिली.
के. सी. वेणुगोपाल म्हणाले की, २४ डिसेंबरला देशातील प्रत्येक जिल्ह्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर सन्मान मोर्चा काढण्यात येईल. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून या मोर्चाची सुरुवात होईल आणि मोर्चाच्या शेवटी स्थानिक जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येईल.
दरम्यान, २२ आणि २३ डिसेंबरला काँग्रेस पक्षाचे सर्व खासदार आपल्या मतदारसंघात आणि काँग्रेस कार्यसमितीचे सर्व सदस्य देशाच्या विविध भागांमध्ये पत्रकार परिषदा घेणार आहेत. या माध्यमातून अमित शाह यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवणार आहेत.