दिसपूर; पीटीआय : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. काँग्रेस पक्ष पुरस्कृत दहशतवाद्यांना पाठिंबा देत आहे, असा गंभीर आरोप त्यांनी केला. आसामच्या दरंग जिल्ह्यातील मंगळदोई येथे एका जाहीर सभेला संबोधित करताना, त्यांनी काँग्रेसवर घुसखोरांना आणि राष्ट्रविरोधी शक्तींना संरक्षण दिल्याचाही आरोप केला.
‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान, आपल्या सशस्त्र दलांनी पाकिस्तानमधील दहशतवादी तळ नष्ट केले. मात्र, त्यावेळी काँग्रेस सैन्याला पाठिंबा देण्याऐवजी घुसखोरांना आणि देशविरोधी शक्तींना वाचवण्यात गुंतली होती, असे पंतप्रधान म्हणाले. ‘ऑपरेशन सिंदूर’चे यश हे माँ कामाख्याच्या आशीर्वादानेच मिळाले असल्याचेही त्यांनी नमूद केले.
पंतप्रधानांनी भारतरत्न भूपेन हजारिका यांच्या अपमानावरून काँग्रेसला धारेवर धरले. ते म्हणाले, 1962 च्या चीन आक्रमणावेळी पंडित नेहरूंनी आसामच्या लोकांना दिलेल्या जखमा अजून भरलेल्या नाहीत, त्यात भूपेन हजारिकांचा अपमान म्हणजे जखमेवर मीठ चोळण्यासारखे आहे. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी शनिवारी रात्री आपल्याला एक व्हिडीओ दाखवला, ज्यात काँग्रेसचे माजी अध्यक्ष ‘भाजप गायक आणि नर्तकांचा सन्मान करत आहे’ असे म्हणताना दिसत होते, असा दावा मोदींनी केला. हा व्हिडीओ भूपेन हजारिका यांना 2019 मध्ये भारतरत्न दिल्यानंतरचा होता, असे ते म्हणाले.
घुसखोरांना जमीन बळकावू देणार नाही आणि लोकसंख्या बदलण्याचा त्यांचा कट भाजप यशस्वी होऊ देणार नाही, असा इशारा मोदींनी दिला. घुसखोरीद्वारे सीमावर्ती भागातील लोकसंख्या बदलण्याचे षड्यंत्र रचले जात आहे, जो राष्ट्रीय सुरक्षेसाठी गंभीर धोका आहे, म्हणूनच आता देशव्यापी ‘डेमोग्राफी मिशन’ सुरू केले जात आहे, असे त्यांनी जाहीर केले.