पाटणा; वृत्तसंस्था : काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दल (राजद) यांच्यात मतभेद उफाळून येत आहेत. बिहार विधानसभा निवडणुकीनंतर हे आघाडीतील पक्ष “एकमेकांचे केस उपटतील,” अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर निशाणा साधला.
अररिया येथे एका निवडणूक सभेला संबोधित करताना पंतप्रधान मोदींनी विरोधी पक्षांवर घुसखोरांना संरक्षण देण्याचा आणि राजकीय फायद्यासाठी जनतेची दिशाभूल करण्याचा आरोपही केला. यावेळी ते म्हणाले की, आमच्या या प्रयत्नांसमोर एक खूप मोठे आव्हान आहे. ते आव्हान आहे घुसखोरांचे. एनडीए सरकार प्रत्येक घुसखोराला ओळखून त्याला देशाबाहेर काढण्यासाठी पूर्ण प्रामाणिकपणे काम करत आहे. पण, हे राजद आणि काँग्रेसचे लोक घुसखोरांना वाचवण्यात व्यस्त आहेत. या घुसखोरांना वाचवण्यासाठी ते सर्व प्रकारची खोटी माहिती पसरवतात आणि लोकांची दिशाभूल करण्यासाठी राजकीय दौरे काढतात. काँग्रेस-राजद आघाडी अंतर्गत मतभेदांच्या ओझ्याखाली कोसळणारच आहे. “काँग्रेस आणि राजद लवकरच एकमेकांशी भांडतील, ते एकमेकांचे केस उपटतील. त्यांची ही भागीदारी अशीच आहे - सोयीसाठी बनलेली, विश्वासासाठी नाही,” असे ते म्हणाले.
एनडीए सरकारच्या विकासाच्या कामगिरीवर प्रकाश टाकत पंतप्रधान मोदींनी बिहारच्या प्रगतीचा मार्ग बदलण्याचे श्रेय मुख्यमंत्री नितीश कुमार यांना दिले. “एनडीए सरकारमध्ये नितीश कुमार यांनी बिहारला जंगलराजमधून बाहेर काढण्यासाठी अथक परिश्रम घेतले आहेत. 2014 मध्ये डबल-इंजिन सरकार स्थापन झाल्यानंतर बिहारच्या विकासाला नवा वेग मिळाला. 1990 ते 2005 या 15 वर्षांच्या राजदच्या राजवटीत राज्याची ‘शून्य’ प्रगती झाली. जंगलराजच्या काळात बिहारमध्ये झालेल्या विकासाचे रिपोर्ट कार्ड शून्य आहे. 1990 ते 2005 या 15 वर्षांत या जंगलराजने बिहारला उद्ध्वस्त केले. त्या काळात सरकार चालवण्याच्या नावाखाली तुमची फक्तलूट झाली.”