Congress Ramlila Maidan Rally Delhi Police Permission : आगामी १ नोव्हेंबर रोजी रामलीला मैदानावर होणाऱ्या काँग्रेसच्या प्रस्तावित सभेबाबत दिल्ली पोलिसांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत होणाऱ्या या सभेला आमचा कोणताही विरोध नाही, मात्र त्यासाठी पोलिसांच्या १४ अटींचे तंतोतंत पालन करावे लागेल, असे पोलिसांनी मंगळवारी स्पष्ट केले.दरम्यान, 'इंडिया' (INDIA) आघाडीच्या वतीने मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात निदर्शने करण्याची योजना आखली जात होती. परंतु पोलिसांनी या कार्यक्रमाला परवानगी नाकारल्याचा आरोप काँग्रेसने केला होता. या वादानंतर मंगळवारी संध्याकाळी दिल्ली पोलिसांनी निवेदन प्रसिद्ध करत परिस्थिती स्पष्ट केली.
१ नोव्हेंबरच्या सभेसाठी २५ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर या कालावधीत रामलीला मैदान आरक्षित करण्यासाठी दिलेले 'ना हरकत प्रमाणपत्र' (NOC) अजूनही कायम आहे. कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने आमची कोणतीही हरकत नाही; मात्र दिलेल्या अटी पाळणे आणि संबंधित जमीन मालकाची परवानगी घेणे बंधनकारक आहे, असे पोलिसांनी पत्रात नमूद केले आहे.यापूर्वी पोलिसांनी काँग्रेस पक्षाच्या मुख्यालय प्रभारींच्या नावाने एनओसी जारी केली होती. त्यात सुमारे १४ नियमांची यादीच जोडण्यात आली आहे.
१. आयोजनांशी संबंधित सर्व नियम आणि कायद्यांचे काटेकोर पालन करावे लागेल.
२. उपस्थित जनसमुदायावर नियंत्रण ठेवणे आणि कोणतीही हिंसा किंवा सुव्यवस्थेचा भंग होणार नाही याची दक्षता घेणे आयोजकांची जबाबदारी असेल.
३. प्रवेश आणि बाहेर पडण्याचे मार्ग, मंच, बैठक व्यवस्था आणि परिसर या ठिकाणी उच्च क्षमतेचे (HD) कॅमेरे लावावे लागतील. यात रेकॉर्डिंग सुविधा, किमान ५ स्क्रीनचे मॉनिटरिंग आणि स्वतंत्र नियंत्रण कक्ष असावा.
४. उपस्थितांसाठी पुरेशा प्रमाणात पिण्याचे पाणी आणि शौचालयांची (महिलांसाठी स्वतंत्र) सोय करावी लागेल.
५. सभेचे नियोजन सुरळीत ठेवण्यासाठी एकसारखा गणवेश किंवा ओळखपत्र (बॅज) असलेले स्वयंसेवक तैनात करावे लागतील.
६. १ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता सभा संपवणे आवश्यक आहे. त्यानंतर लोकांनी मैदान खाली करणे अपेक्षित असून कोणत्याही परिस्थितीत वेळ वाढवून दिली जाणार नाही.
७. सभेच्या आधी किंवा नंतर कोणालाही रामलीला मैदानात रात्री मुक्काम करता येणार नाही.
८. सर्व गाड्या, बस आणि टेम्पो वाहतूक पोलिसांनी निश्चित केलेल्या अधिकृत पार्किंगच्या ठिकाणीच पार्क कराव्या लागतील.
९. सभा शांततेत पार पडेल आणि सहभागी व्यक्तींकडून कोणताही हिंसक किंवा आक्रमक व्यवहार होणार नाही याची खात्री द्यावी लागेल.
१०. स्थानिक कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांना सहकार्य करणे आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचना पाळणे बंधनकारक राहील. नियमांचा भंग झाल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल.
११. कोणत्याही वक्त्याला जात, धर्म किंवा वर्ण यावरून सामाजिक सौहार्द बिघडवणारे वक्तव्य करता येणार नाही.
१२. चिथावणीखोर किंवा धमकावणारे भाषण सुरू झाल्यास आयोजकांनी तातडीने ध्वनिवर्धक (PA System) बंद करून संबंधित वक्त्याला मंचावरून हटवावे लागेल.
१३. रामलीला मैदाना व्यतिरिक्त इतर कोणत्याही दिशेने कोणताही मोर्चा किंवा मिरवणूक काढता येणार नाही.
१४. निमंत्रित व्यक्ती, स्वयंसेवकांची यादी, मिनिट-टू-मिनिट कार्यक्रम आणि वाहनांचे नोंदणी क्रमांक पोलिसांना आधीच सादर करावे लागतील.
मध्य दिल्लीच्या पोलीस उपआयुक्तांनी जारी केलेल्या या पत्रात इशारा दिला आहे की, पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे उल्लंघन झाल्यास ही परवानगी कोणत्याही क्षणी रद्द केली जाऊ शकते.
काँग्रेस नेते के. सी. वेणुगोपाल यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत प्रशासनावर गंभीर आरोप केले. अशोक हॉटेलने आधी कार्यक्रमासाठी परवानगी दिली होती, मात्र नंतर अचानक ती नाकारली, असा दावा त्यांनी केला. 'वोट चोरी'च्या मुद्द्यावरून 'इंडिया' आघाडीतील २१ पक्ष ३० ऑक्टोबर रोजी मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात 'जनता महाभियोग' लावणारा कार्यक्रम घेणार होते, ज्याला सरकारने अडवल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.