राष्ट्रीय

Delimitation Bill 2026 : स्टॅलिन यांची मनधरणी करण्यात राहुल गांधींना अपयश : ७० मिनिटांच्या चर्चेनंतरही ‘द्रमुक’ PM मोदींच्या पाठीशी ठाम उभारणार

Rahul Gandhi MK Stalin Meeting : सोनिया गांधी, राहुल, ममता, खर्गेसह इतर नेत्‍यांची चेन्‍नई वारी फुकट

पुढारी वृत्तसेवा

  • राहुल गांधी यांची डीएमके प्रमुख एम. के. स्टॅलिन यांच्‍याशी गळाभेट

  • ‘इंडिया’ आघाडीच्या नेत्यांची मागणी मान्य करण्यास एम. के. स्टॅलिन यांचा नकार

  • राहुल गांधी म्हणाले, आम्ही आमची भूमिका स्टॅलिन यांच्यासमोर मांडली

चेन्नई / नवी दिल्ली : संसदेच्या सोमवारपासून सुरू होणाऱ्या विशेष सत्रापूर्वी विरोधी पक्षांच्या ‘इंडिया’ आघाडीत मोठी फूट पडल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. केंद्र सरकारच्या परिसीमन विधेयकाला पाठिंबा देणाऱ्या तामिळनाडूचे मुख्यमंत्री आणि डीएमके प्रमुख एम. के. स्टॅलिन यांचे मन वळवण्यासाठी ‘इंडिया’ ब्लॉकच्या ६ पक्षांच्या दिग्गज नेत्यांनी चेन्नईत धाव घेतली.

मात्र, सोनिया गांधी, राहुल गांधी, मल्लिकार्जुन खर्गे आणि ममता बॅनर्जी यांच्यासोबत झालेल्या ७० मिनिटांच्या प्रदीर्घ बैठकीनंतरही स्टॅलिन आपल्या निर्णयावर ठाम राहिले. बैठक संपताच लोकसभेत २२ खासदार असणार्‍या डीएमकेने परिसीमन विधेयकावर केंद्र सरकारला पाठिंबा देण्याची अधिकृत घोषणा केली आहे.

७० मिनिटांची खलबते व डीएमकेची अधिकृत घोषणा

चेन्नईतील स्टॅलिन यांच्या निवासस्थानी पोहोचताच स्टॅलिन यांनी राहुल गांधी यांच्याशी हस्तांदोलन केले आणि त्यांची गळाभेट घेतली. त्यानंतर आघाडीच्या नेत्यांमध्ये तब्बल ७० मिनिटे सविस्तर चर्चा झाली. या प्रदीर्घ चर्चेनंतर स्टॅलिन यांनी स्पष्ट केले की, त्यांचा पक्ष ‘निष्पक्ष परिसीमनाच्या’ मागणीवर ठाम आहे. तसेच या बैठकीनंतर लगेचच डीएमकेच्या अधिकृत आयटी सेल हँडलवरून ट्विट करत परिसीमन विधेयकावर केंद्र सरकारला पाठिंबा देत असल्याची घोषणा करण्यात आली.

२२ खासदारांचे बळ सरकारच्या बाजूने

स्टॅलिन यांनी एक दिवस आधीच या विधेयकाला समर्थन देण्याचे संकेत दिले होते. लोकसभेत डीएमकेचे २२ खासदार असल्याने हा मोदी सरकारसाठी मोठा दिलासा मानला जात आहे.

आमची भूमिका अशी आहे की, जर परिसीमन विधेयक नामंजूर झाले, तर तामिळनाडूला दिलेले किमान संरक्षणही गमावले जाईल. परिसीमन विधेयकाला पाठिंबा देण्याशिवाय दुसरा पर्याय नाही.
-एम. के. स्टॅलिन, डीएमके प्रमुख
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) ही तमिळविरोधी शक्ती असून ती तमिळ संस्कृतीच्या विचाराचा विरोध करते, हे आम्ही त्यांना सांगितले. एकदा भाजपने भारतातील मतदारसंघांची पुनर्रचना करून ८५० जागा केल्या, तर देशातील लोकशाही संपुष्टात येईल आणि तमिळ संस्कृती व भाषेवर पूर्णपणे हल्ला सुरू होईल. माझे हे शब्द लक्षात ठेवा.
- राहुल गांधी, विरोधी पक्षनेते

स्‍टॅलिन भेटीचा घटनाक्रम

दुपारी २.०० वाजता : इंडिया ब्लॉकमधील सहा पक्षांचे प्रतिनिधीमंडळ चेन्नईत दाखल झाले. ममता बॅनर्जी, सोनिया गांधी आणि खर्गे यांच्यासह अनेक नेते चेन्नई विमानतळाच्या लाऊंजमध्ये बसलेले दिसले.

दुपारी २.३० वाजता : विरोधी पक्षनेते बसमध्ये बसून चेन्नईतील एका हॉटेलकडे रवाना झाले. तिथे त्यांनी सुमारे दोन तास वाट पाहिली.

दुपारी ४.३० वाजता : सर्व नेत्यांचे स्टॅलिन यांच्या घरी स्वागत करण्यात आले. स्टॅलिन यांनी राहुल गांधींशी हस्तांदोलन केले आणि नंतर त्यांना मिठी मारली.

सायंकाळी ६.०० वाजता : स्टॅलिन यांच्यासोबतची बैठक सुमारे ७० मिनिटे चालली. राहुल गांधी आणि इतर नेते घरातून बाहेर पडले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT