नवी दिल्ली : नॅशनल हेराल्ड प्रकरणात सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्यावर आरोपपत्र दाखल करण्यात आले. त्याच्या निषेधार्थ आणि ईडीच्या विरोधात काँग्रेसने देशभर निदर्शने केली. दिल्लीतील काँग्रेस पक्ष मुख्यालयासमोरही काँग्रेसने निदर्शने केली. दरम्यान, निदर्शने करणाऱ्या कार्यकर्त्यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले होते. नॅशनल हेराल्ड प्रकरणाची सुनावणी २५ एप्रिल रोजी दिल्लीतील राऊस अव्हेन्यू न्यायालयात होणार आहे. न्यायालयाने ईडीकडून या प्रकरणाची केस डायरीही मागितली आहे. २०१२ मध्ये भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी या प्रकरणाची तक्रार केली होती.
काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी बुधवारी देशभरातील ईडी कार्यालयासमोर निदर्शने केली. दिल्लीतील ईडी कार्यालयासमोर आणि काँग्रेस कार्यालयातही केंद्र सरकारविरुद्ध निदर्शने करण्यात आली. केंद्र सरकारच्या विरूद्ध आणि सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्या समर्थनात जोरदार घोषणाबाजी यावेळी करण्यात आली. मोठ्या प्रमाणात सुरक्षा व्यवस्था यावेळी तैनात करण्यात आली होती.
काँग्रेस मुख्यालयासमोर करण्यात आलेल्या आंदोलनात काँग्रेस सरचिटणीस सचिन पायलट, दिल्ली प्रदेशाध्यक्ष देवेंद्र यादव, खा. इम्रान प्रतापगढ़ी, काँग्रेस नेत्या दीपा दास मुन्शी, गुरदीप सप्पल, काँग्रेस प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत, अल्का लांबा, उदित राज, संदीप दीक्षित आदी नेते उपस्थित होते. यावेळी बोलताना सचिन पायलट म्हणाले की, या प्रकरणात काहीही तथ्य नाही. हे राजकीयदृष्ट्या प्रेरित प्रकरण आहे. राहुल गांधी, सोनिया गांधी यांना जाणूनबुजून लक्ष्य करण्यात आले आहे. आम्हाला न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. आम्ही अलीकडेच गुजरातमध्ये एक परिषद आयोजित केली होती. आम्ही पक्षाला मजबुतीने उभा करण्याचा प्रयत्न करत आहोत. सरकारला ते आवडत नाही, म्हणून सरकारने जाणूनबुजून हे पाऊल उचलले आहे, अशी टीकाही त्यांनी केली.