नवी दिल्ली : मध्य प्रदेशातील राज्यसभा निवडणुकीसाठी काँग्रेसच्या उमेदवार मीनाक्षी नटराजन यांचा उमेदवारी अर्ज रद्द करण्यात आला. त्यानंतर निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी भेटीसाठी वेळ न दिल्याचा आरोप करत काँग्रेसच्या शिष्टमंडळामे निवडणूक आयोगाच्या प्रवेशद्वारावरच धरणे आंदोलन केले. काँग्रेसच्या या शिष्टमंडळात संघटना सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल, पक्षाचे नेते भूपेश बघेल, जयराम रमेश, सचिन पायलट, दीपा दासमुनशी आदी नेते उपस्थित होते.
काँग्रेसचे सरचिटणीस सचिन पायलट यांनी या प्रकरणावर तीव्र नाराजी व्यक्त केली. देशाच्या लोकशाहीच्या इतिहासात आजपर्यंत असे कधी घडले नव्हते. कोणतेही ठोस कारण नसताना काँग्रेस उमेदवाराचा उमेदवारी अर्ज रद्द करण्यात आला. आमच्या उमेदवारावर कोणताही खटला नाही, तरीही जाणीवपूर्वक लोकशाहीची हत्या केली जात आहे, असा आरोप त्यांनी केला. दोन तासांपूर्वीच आम्ही निवडणूक आयोगाला भेटीसंदर्भात माहिती दिली होती. मात्र तरीही आम्हाला आयोगात प्रवेश दिला गेला नाही. आम्ही जिंकत असलेली जागा कोणतेही वैध कारण नसताना रद्द करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत न्यायासाठी दाद कुणाकडे मागायची?" असा सवालही पायलट यांनी उपस्थित केला.
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणामागे राजकीय कट असल्याचा आरोप काँग्रेसने आला. निवडणूक आयोगाच्या मदतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकशाहीची हत्या करण्याचे काम करत आहेत. त्याच कटाचा भाग म्हणून मध्य प्रदेशातून राज्यसभा निवडणूक लढवणाऱ्या काँग्रेसच्या उमेदवार मीनाक्षी नटराजन यांचा उमेदवारी अर्ज रद्द करण्यात आला, असा आरोप पक्षाने केला.
काँग्रेसच्या मते, या निर्णयाविरोधात निवडणूक आयोगाकडे निवेदन देण्यासाठी शिष्टमंडळ गेले असता आयोगाचे अधिकारी भेटण्यास तयार नव्हते. त्यामुळे काँग्रेसच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना निवडणूक आयोगाच्या बाहेरच धरणे आंदोलन करावे लागले. देशातील जनता सर्व घडामोडी पाहत आहे. लोकशाही संस्थांचा वापर करून विरोधकांना लक्ष्य करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असा आरोप काँग्रेसने केला असून या प्रकरणाविरोधात कायदेशीर आणि राजकीय लढा सुरू ठेवण्याचा निर्धार पक्षाने व्यक्त केला आहे.