राष्ट्रीय

तुरुंगात टाकले, तरी प्रश्न विचारणारच : राहुल गांधी

दिनेश चोरगे

बंगळूर; पुढारी वृत्तसेवा :  कर्नाटकात भाजपने 40 टक्के 'कमिशन राज' सुरू केले. या सरकारने कर्नाटकातील जनतेच्या पैशांची चोरी केली आहे. हे मी बोलत नाही, तर कंत्राटदारांच्या सघटनांनीच तसे पत्र पंतप्रधानांना लिहिले आहे. त्याचे उत्तर पंतप्रधानांनी दिले नाही, याचा अर्थ पंतप्रधानांना 40 टक्के कमिशन मान्य आहे, असा होतो. त्यांनी का उत्तर दिले नाही? मला तुरुंगात टाकले तरी मी प्रश्न विचारणारच, असे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

कोलारमध्ये रविवारी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची सभा झाली. कोलारमध्येच 2019 मध्ये लोकसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ झालेल्या सभेत राहुल यांनी देशाची लूट करणारे लोक विशिष्ट आडनावाचेच का आहेत, असा प्रश्न विचारला होता. त्यावरूनच त्यांना गुजरातमधील न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा ठोठावलेली आहे. त्या शिक्षेला उत्तर देण्यासाठी सुरू केलेल्या सत्याग्रह यात्रेत बोलताना राहुल यांनी पुन्हा भाजपवर टीका केली. व्यासपीठावर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार, माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आदी होते.

राहुल म्हणाले, उद्योजक अदानी यांच्या कंपनीमधील 20 हजार कोटी कोणाचे आहेत याचे उत्तर मिळाले पाहिजे. मला अपात्र ठरवा किंवा तुरुंगात टाका, मी शांत बसणार नाही. अदानी, मोदी हे भ्रष्टाचाराचे उदाहरण आहेत. भारतातील सर्व मूलभूत सुविधा अदानींना पोहोचवल्या जात आहेत. अदानी कंपनीकडे हजारो रुपये येत आहेत. देशाच्या संरक्षण खात्याचा संचालक एक चिनी व्यक्ती आहे. एक चिनी व्यक्तीही अदानीच्या कंपनीत संचालक आहे. यावर कोणीच प्रश्न करत नाही. मी प्रश्न केल्यास ते वादग्रस्त विधान बनते.

राहुल पुढे म्हणाले, मी हिंदूंचा अपमान करतोय असा आरोप माझ्यावर होतो. पण देशातील सर्व मोठ्या पदांवर कोणत्या समाजाचे लोक आहेत, याचा विचार करा. केंद्र सरकारच्या मंत्रालयात दलित आणि मागासवर्गीयांसाठी केवळ 7 टक्के जागा आहेत. मागासांना जास्त जागा का दिल्या जात नाहीत? काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकाराने 2011 साली जनगनणा केली. सर्व जातनिहाय आकडेवारी सर्वांसमोर ठेवली. मोदी सरकारने जनगणना करावी आणि जातनिहाय आकडेवारी जाहीर करावी. दलितांना लोकसंख्येच्या आधारावर संधी उपलब्ध करून दिली पाहिजे.

SCROLL FOR NEXT