पाटणा : काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी शनिवारी बिहारच्या जनतेला आगामी विधानसभा निवडणुकीत विचारपूर्वक मतदान करण्याचे आवाहन केले.
बेगुसराय येथील एका राजकीय सभेला संबोधित करताना काँग्रेस खासदार म्हणाल्या की, बिहारमधील एनडीए सरकारचा हेतू चांगला नाही; कारण त्यांनी राज्यातील महिलांसाठी काहीही केले नाही आणि निवडणुकीच्या तोंडावर केवळ 10,000 रुपये वाटले. जेव्हा जनता जागरूक होते, तेव्हा महालांमध्ये राहणारे आणि आपली प्रतिमा जपण्यावर लक्ष केंद्रित करणारे राजकारणी घाबरू लागतात. म्हणूनच ते मतचोरीचा अवलंब करतात. बिहारमध्ये एनडीए सरकारचे नेतृत्व करत असूनही मुख्यमंत्री नितीश कुमार यांचेही ऐकले जात नाही. त्यांनी भाजपवर नवी दिल्लीतून बिहार सरकार चालवत असल्याचा आरोप केला.
बिहारमध्ये तरुण बेरोजगार आहेत आणि भ्रष्टाचार फोफावला आहे. तुम्हाला बिहारमध्ये दिसणारे सर्व कारखाने काँग्रेसच्या काळात सुरू झाले; आयआयटी आणि एम्ससारख्या संस्था जवाहरलाल नेहरूंनी उभारल्या. आम्ही अल्पसंख्याकांचे शोषण संपवण्यासाठी समाजात समानतेची मागणी करतो, असे गांधी म्हणाल्या.
सभेनंतर पत्रकारांशी बोलताना गांधी म्हणाल्या, माझ्या मते, बिहारच्या जनतेचे अजिबात ऐकले जात नाही. भाजपमध्ये त्यांचे ऐकले जात नाही, नितीशजींचेही ऐकले जात नाही. हे सरकार केंद्रातून चालवले जात आहे... त्यामुळे हे डबल इंजिन नसून खरे तर सिंगल इंजिन आहे. दुसरे कोणतेही इंजिन नाही. तुम्ही हे इतर राज्यांमध्येही पाहिले आहे. अचानक असा मुख्यमंत्री येतो, ज्याचे नाव कोणी ऐकलेलेही नसते. तो कुठून आला? जर डबल इंजिन असेल, तर आधी राज्यातील लोकांचे ऐका. त्यांना अधिकार द्या. ते निवडतील. तुम्ही तर मुख्यमंत्री कोण होणार, हेही सांगू शकत नाही.