पुढारी ऑनलाईन डेस्क : ‘गेल्या 10 वर्षांत मला फक्त एकदाच सोनिया गांधींना भेटण्याची संधी मिळाली आहे. गांधी घराण्याने माझी राजकीय कारकीर्द घडवली आणि त्यांनीच उद्ध्वस्त केली, पण मी कधीही भाजपमध्ये जाणार नाही,’ असा धक्कादायक खुलासा खुद्द काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मणिशंकर अय्यर यांनी केला आहे.
वृत्तसंस्था पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत अय्यर यांनी अनेक खुलासे केले. ते म्हणाले की, ‘मला एकदा राहुल गांधींना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायच्या होत्या. पण यासाठी मला प्रियंका गांधींना फोन करावा लागला होता. तसेच एकदा मी सोनिया गांधींना मेरी ख्रिसमसच्या शुभेच्छा दिल्या तेव्हा मॅडम म्हणाल्या मी ख्रिश्चन नाही.’
83 वर्षीय अय्यर यांनी दावा केला आहे की त्यांना गांधी कुटुंबातील प्रमुख सदस्यांशी वर्षानुवर्षे भेटता आलेले नाही. ते म्हणाले की, 10 वर्षांपासून मला सोनिया गांधींना समोरासमोर भेटण्याची आणि राहुल गांधींसोबत वेळ घालवण्याची एकही संधी दिली गेली नाही.’
अय्यर यांनी त्यांच्या पुस्तकात (मणिशंकर अय्यर ए मॅव्हरिक इन पॉलिटिक्स) म्हटलंय की, ‘2024 च्या निवडणुकीत राहुल गांधींनी मला तिकीट दिले नाही. खरेतर मणिशंकर अय्यर हे म्हातारे झाले आहेत. त्यामुळे यांना तिकीट देणार नाहीत हे त्यांनी आधीच स्पष्ट केले होते.’
अय्यर यांनी तामिळनाडूमधील मायलादुथुराई येथून तीनदा लोकसभा निवडणूक जिंकली असून ते राज्यसभेचे खासदारही राहिले आहेत.
अय्यर पुढे म्हणतात, प्रणव मुखर्जी पंतप्रधान असते तर 2014 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाला नसता. पण त्या निवडणुकीत काँग्रेसचा वाईटरित्या पराभव झाला. मुखर्जी यांना आपल्याला पंतप्रधान आणि मनमोहन सिंग यांना राष्ट्रपती बनवले जाईल, असे वाटत होते. पण तसे झाले नाही.
‘2012 पासून काँग्रेसची अवस्था वाईट होती. त्यामुळे पक्षाध्यक्ष आणि पंतप्रधान निवडणुकीत सक्रिय नव्हते. तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर 2012 मध्ये हृदय शस्त्रक्रिया झाली. त्यानंतर ते कधीही शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त राहू शकले नाहीत. यामुळे त्यांच्या कार्यक्षमतेवर परिणाम झाला. याचे परिणाम शासनात दिसून आले. पक्षाचा विचार केला तर तत्कालीन काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी पंतप्रधानांसह आजारी पडल्या. मात्र त्यांच्या प्रकृतीबाबत काँग्रेसकडून कोणतेही अधिकृत वक्तव्य जारी करण्यात आले नाही. पंतप्रधान आणि पक्षाध्यक्ष या दोन कार्यालयांमध्ये समन्वयाचा अभाव आणि सुशासनाचा अभाव असल्याचे लवकरच स्पष्ट झाले. विशेषतः अण्णा हजारे यांचे इंडिया अगेन्स्ट करप्शन आंदोलन प्रभावीपणे हाताळले गेले नाही. पण प्रणव मुखर्जी यांनी ती परिस्थिती अगदी चांगल्या पद्धतीने हाताळली असती,’ असाही दावा अय्यर यांनी त्यांच्या पुस्तकात केला आहे.
2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला प्रथमच पूर्ण बहुमत मिळाले. या निवडणुकीत भाजपने 282 जागा जिंकल्या होत्या तर काँग्रेस केवळ 44 जागांवर घसरली होती.