नवी दिल्ली : पंतप्रधान मोदी आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर भारताचा प्रभाव राखण्यात अपयशी ठरले, असा आरोप काँग्रेसने केला आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारताला अपमानित करण्याचा प्रयत्न करतात आणि त्यावर पंतप्रधान गप्प का आहेत? असा प्रश्न काँग्रेसने उपस्थित केला.
राजधानी दिल्लीतील काँग्रेस कार्यालयात ज्येष्ठ काँग्रेस नेते डॉ. अजय कुमार यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी एक व्हिडिओ दाखवत सांगितले की, फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या संभाषणात अडथळा आणतात आणि त्यांना सांगतात की, ते चुकीचे बोलत आहेत. मात्र ट्रम्प पंतप्रधान मोदींसमोर भारताबद्दल वाईट बोलत राहिले. ते भारताला टॅरिफ (आयात कर धोरण) उल्लंघन करणारा म्हणत राहिले. ट्रम्प यांनी भारतावर परस्पर शुल्क लादण्याबद्दल बोलले, मात्र पंतप्रधान मोदी गप्प राहिले. पंतप्रधान मोदी डोनाल्ड ट्रम्प यांना आपला चांगला मित्र म्हणतात आणि तेच ट्रम्प सतत भारताला अपमानित करण्याचा प्रयत्न करतात. भाजप पंतप्रधान मोदींना जागतिक नेते म्हणताना थकत नाही, मात्र जेव्हा ते अमेरिका दौऱ्यावर गेले तेव्हा ट्रम्प पंतप्रधान मोदींचे स्वागत करायलाही आले नाहीत, असेही ते म्हणाले.
डॉ. अजय कुमार म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिका दौऱ्यावरून परत येताच अमेरिकेने घोषणा केली की एफ-१६ लढाऊ विमानांच्या देखभालीसाठी पाकिस्तानला ३००० कोटी रुपये दिले जात आहेत. मात्र भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. अमेरिका आणि पाकिस्तानमधील करार असा होता की एफ-१६ लढाऊ विमाने फक्त दहशतवादाविरुद्ध वापरली जातील. पाकिस्तानने आपल्याविरुद्ध एफ-१६ लढाऊ विमानांचा वापर केला आहे, असे भारतीय लष्करी अधिकाऱ्यांनी अनेकदा सांगितले असले तरीही मोदी सरकार गप्प राहिले. असे सांगतानाच जवाहरलाल नेहरु आणि इंदिरा गांधींच्या काळात अमेरिकेने आमच्यावर अनेक वेळा दबाव आणला होता, मात्र आम्ही झुकलो नाही. आम्ही देशाचा स्वाभिमान उंच ठेवल्याचे सांगत केंद्र सरकारवर टीका केली.
डॉ. अजय कुमार म्हणाले की, जेव्हा भारत अमेरिकन कृषी उत्पादनांवरील कर काढून टाकेल तेव्हा भारतातील शेती आणि शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होईल. जर सफरचंदांवरील कर रद्द केला तर हिमाचलमधील सफरचंद व्यापाऱ्यांना त्रास होईल. जर द्राक्षांवरील कर रद्द केला तर महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशला त्रास होईल. त्याचवेळी जर वाहनांवरील शुल्क काढून टाकले तर भारतीय कार बाजाराचे मोठे नुकसान होईल. आज चीनमधून इलेक्ट्रॉनिक वस्तू भारतात येत आहेत. जर इतर वस्तूही बाहेरून येऊ लागल्या तर देशात काय उत्पादन होईल, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.