नवी दिल्ली : उमेश कुमार
‘मतचोरी’चा मुद्दा सहजासहजी दाबला जाणार नाही. काँग्रेस पूर्ण तयारीने मैदानात आहे. पक्षाने आतापर्यंत मतचोरीचा फक्त एकच बॉम्बस्फोट केला आहे; तर क्लस्टर अणुबॉम्बचा साठा साठवला आहे. हळूहळू पक्ष ते आपल्या पिशवीतून बाहेर काढेल आणि निवडणूक आयोगावर हल्ला करेल. हल्ला निवडणूक आयोगावर असू शकतो, पण लक्ष्य भाजप असेल.
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी कर्नाटकातील बंगळूर मध्यवर्ती लोकसभा मतदारसंघातील महादेवपुरा येथे मतचोरीचा बॉम्बस्फोट घडवला. त्यांनी याला फक्त एक नमुना म्हटले आणि असे म्हटले की, हे संपूर्ण देशात घडले आहे.
सूत्रांचे म्हणणे आहे की, राहुल गांधी यांनी हे विनाकारण सांगितले नाही. काँग्रेसने 35 लोकसभा जागांवर अशीच चौकशी करून सविस्तर अहवाल तयार केला आहे. त्यापैकी 28 कर्नाटकातील आणि 7 मध्य प्रदेशातील आहेत. तो इतक्या गुप्ततेने तयार करण्यात आला आहे की, काँग्रेसच्या काही निवडक दोन-तीन नेत्यांशिवाय कोणालाही त्याची कल्पना आली नाही. हेच कारण आहे की, राहुल गांधी अणुबॉम्ब फोडण्याबद्दल बोलत असतानाही काँग्रेस नेत्यांना मतचोरीच्या ‘महादेवपुरा’ स्फोटाची कल्पनाही नव्हती. सत्ताधारी पक्षालाही त्याची गंधवार्ता मिळू शकली नाही.
निवडणूक आयोगाच्या विशेष सघन आढावा (डखठ) वर संसदेत एकता दाखवल्यानंतर विरोधी पक्षांमध्ये समन्वयाचा एक नवीन टप्पा सुरू होताना दिसत आहे. कर्नाटकातील कथित ‘मतचोरी’वरील राहुल गांधी यांच्या सादरीकरणादरम्यान विरोधी खासदारांनी त्यांचे कौतुक केले आणि विरोधी आघाडी ‘इंडिया’ ब्लॉकमध्ये आता हे वातावरण पुढे नेण्याचे प्रयत्न तीव्र केले जात आहेत.
गुरुवारी संध्याकाळी राहुल गांधी यांनी दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी ‘इंडिया’ आघाडीच्या प्रमुख नेत्यांसाठी रात्रीच्या जेवणाचे आयोजन केले होते. त्यामध्ये बिहार विधानसभेतील विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव देखील उपस्थित होते. दरम्यान, दोन्ही नेत्यांनी 1 सप्टेंबर रोजी पाटणा येथे होणार्या काँग्रेस-राजद संयुक्त रॅलीसाठी सर्व पक्षांना आमंत्रित केले. जर सर्व नेते या मंचावर एकत्र दिसले तर निवडणूक वातावरणात विरोधी पक्ष एकत्र येतील, असा हा दुर्मीळ प्रसंग असेल.2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यानही हे दृश्य दिसले नव्हते.
पूर्वी विरोधी पक्षांचा असा मेळावा फक्त दोनवेळा झाला होता. दिल्ली आणि रांचीमध्ये. जेव्हा दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि झारखंडचे तत्कालीन मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या अटकेविरुद्ध निदर्शने करण्यात आली होती. पाटणा रॅली देखील विशेष मानली जाते. कारण त्यात केरळमध्ये काँग्रेस विरुद्ध सीपीआय (एम) आणि पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस विरुद्ध काँग्रेस आणि डाव्या पक्षांचे नेते एकत्र मंचावर बसताना दिसतील.
राहुल गांधी ज्या पद्धतीने आपल्या विधानांवर ठाम आहेत, त्यावरून सत्ताधारी पक्ष आणि निवडणूक आयोग दोघेही ठोस काहीही बोलण्याच्या स्थितीत दिसत नाहीत. तथापि सत्ताधारी पक्ष आणि निवडणूक आयोग दोघेही राहुल गांधींचे विधान निराधार सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण या प्रयत्नात आत्मविश्वासाचा अभाव दिसतो.