काँग्रेसचे शिष्टमंडळ निवडणूक आयोगाच्या भेटीला, आयोग लेखी उत्तर देणार  File Photo
राष्ट्रीय

काँग्रेसचे शिष्टमंडळ निवडणूक आयोगाच्या भेटीला, आयोग लेखी उत्तर देणार

Congress EC meeting : आयोगासमोर मतदानातील आकड्यांबद्दल भुमिका मांडली

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकालाच्या पार्श्वभुमीवर काँग्रेसच्या शिष्टमंडळाने केंद्रीय निवडणूक आयोगाची भेट घेतली. काँग्रेसने उपस्थित केलेल्या सर्व प्रश्नांवर निवडणूक आयोगाने लेखी उत्तर देण्याचे आश्वासन दिले. पक्षाच्या शिष्टमंडळात पक्षाचे सरचिटणीस मुकुल वासनिक, ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते पवन खेडा, प्रोफेशनल काँग्रेसचे अध्यक्ष प्रवीण चक्रवर्ती होते.

महाराष्ट्र विधानसभेचे निकाल लागले. यामध्ये काँग्रेससह विरोधी पक्षांना दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. यानंतर ईव्हीएमसह मतदानाची वाढलेली आकडेवारी आणि विविध विषयांवर काँग्रेसने काही प्रश्न उपस्थित केले. या प्रश्नांच्या संदर्भात काँग्रेसने एक पत्र निवडणूक आयोगाला लिहिले होते. त्यानंतर निवडणूक आयोगाच्या वतीने काँग्रेसच्या शिष्टमंडळाला चर्चेसाठी निमंत्रित करण्यात आले होते.

निवडणूक आयोगासोबत झालेल्या चर्चेनंतर बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, आम्ही आयोगासमोर मतदानातील आकड्यांबद्दल आमची भुमिका मांडली. लोकसभा निवडणुकीनंतर केवळ ६ महिन्यात राज्यात ४६ लाख एवढे नवीन मतदार वाढले. आम्ही आकडे कसे बदलले यावर बोललो. रात्री ११.३० वाजता वेगळी आकडेवारी आणि नंतर दुसऱ्या दिवशी जाहीर झालेली आकडेवारी वेगळी कशी राहु शकते. आम्ही मांडलेले मुद्दे लोकभावना होत्या. आमच्या सर्व प्रश्नांचे निवडणूक आयोगाने लेखी उत्तर देण्याचे आश्वासन दिल्याचेही पटोले म्हणाले.

मरकडवादी ग्रामस्थांना काँग्रेसकडून सलाम- पटोले

सोलापूर जिल्यातील मारकडवाडी गावात बॅलेटवर मतदानाचा प्रयत्न झाला. याबाबत बोलताना नाना पटोले म्हणाले की, आम्ही मारकडवडीला भेट देणार आहोत. मारकडवाडी गावात आज पेटलेल्या ठिणगीचा उद्या वणवा होईल. मरकडवाडी गावात बॅलेटवर मतदान सरकारने होऊ दिले नाही. त्यामुळे जनतेच्या परीक्षेत सरकार नापास झाले आहे. महाराष्ट्रात आयोगाच्या आकडेवारीच्या खेळाविरोधात आम्ही आंदोलन सुरू केले. आम्ही ईव्हीएमवर बोलत नाही तर आम्ही आकड्यांवर बोलत आहोत. आम्ही रडीचा डाव खेळत नाही, असेही पटोले म्हणाले.

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्य सरकारच्या शपथविधीची तारीख जाहीर केली. यावर टीका करत नाना पटोले म्हणाले की, भाजपाला सत्तेचा माज आला, हे यातून स्पष्टपणे दिसते. कुठल्याही पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांनी शपथविधीची तारीख जाहीर करण्याची पद्धत नाही. मात्र भाजपच्या राजवटीत ही राज्याची परिस्थिती आहे. तसेच एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना आता खरी भाजप समजायला सुरुवात झाली आहे, असेही ते म्हणाले.

काँग्रेसचे म्हणणे काय?

मागील आठवड्यात काँग्रेसने एक पत्र केंद्रीय निवडणूक आयोगाला लिहिले होते. या पत्रात नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मतदारांच्या माहितीशी छेडछाड झाल्याचा आरोप केला होता. मतदानाच्या आकडेवारीत ७.८३ टक्के वाढ कशी झाली, एकूण मतांमध्ये ७६ लाख मतदारांची वाढ कशी झाली, असे विचारत ईव्हीएमसह विविध प्रश्न उपस्थित केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT