नवी दिल्ली : कॅनडामध्ये होत असलेल्या जी-7 शिखर परिषद आयोजित केली जात आहे. मात्र या परिषदेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उपस्थिती नसणार आहे. यावरून काँग्रेसने पंतप्रधानांवर टीका केली. सरकार या गोष्टीला काही काहीही वळण दिले तरी ही आणखी एक मोठी राजनैतिक चूक आहे, आधीच भारत सरकारने अमेरिकेला भारत-पाकिस्तानमध्ये मध्यस्थी करण्याची परवानगी देऊन आणि अमेरिकन अधिकार्यांना तटस्थ ठिकाणी चर्चा सुरू ठेवण्यासाठी उघडपणे आवाहन करण्याची परवानगी देऊन अनेक दशकांच्या परराष्ट्र धोरणाला प्रभावित केले आहे, अशी टीका काँग्रेसने केली आहे.
काँग्रेसचे माध्यम सरचिटणीस जयराम रमेश एक्सवर म्हणाले की, 15 जून 2025 पासून कॅनडातील अल्बर्टा प्रांतातील कनानास्किस येथे जी-7 शिखर परिषद आयोजित केली जात आहे. या शिखर परिषदेला अमेरिका आणि फ्रान्सचे अध्यक्ष, ब्रिटन, जपान, इटली आणि कॅनडाचे पंतप्रधान आणि जर्मनीचे चान्सलर उपस्थित राहणार आहेत. यावेळी ब्राझील, मेक्सिको, दक्षिण आफ्रिका आणि युक्रेनचे अध्यक्ष आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान यांनाही आमंत्रित करण्यात आले आहे. भारताच्या पंतप्रधानांना या परिषदेमध्ये आमंत्रित करण्याची परंपरा 2014 नंतरही कायम होती. मात्र गेल्या 6 वर्षांत प्रथमच भारताचे पंतप्रधान या शिखर परिषदेत उपस्थित राहणार नाहीत. ही आणखी एक मोठी राजनैतिक चूक असल्याचे रमेश म्हणाले.