नवी दिल्ली : महागाईच्या आघाडीवर सर्वसामान्यांना मोठा धक्का बसला आहे. डिझेल आणि पेट्रोलवरील उत्पादन शुल्क वाढवल्यानंतर मोदी सरकारने गॅस सिलेंडरच्या किमतीत ५० रुपयांची वाढ केली आहे. उज्ज्वला योजनेअंतर्गत मिळणाऱ्या सिलेंडरवरही ही वाढलेली किंमत लागू होईल. एलपीजी सिलेंडरच्या किमतीत वाढ झाल्याबद्दल काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी सोमवारी (दि.७) सरकारवर टीकास्त्र सोडले.
मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले, आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमतीत ४१ टक्के घट झाली असूनही मोदी सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत दिलासा दिला नाही. त्याऐवजी, केंद्रीय उत्पादन शुल्कात २ रुपयांची वाढ करण्यात आली. यामुळे सामान्य जनतेवर अधिक भार पडला आहे. सरकारने यावर स्पष्टीकरण देखील दिले आहे. सरकारचे म्हणणे आहे की, हे जनतेवर ओझे ठरणार नाही.
पुढे बोलताना काँग्रेस अध्यक्ष खर्गे म्हणाले, पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क वाढवल्यानंतर एलपीजी गॅस सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाला आहे. गॅस दरवाढीमुळे 'उज्ज्वला' योजनेच्या गरीब महिलांनाही महागाईची झळ बसणार आहे. लूट, खंडणी आणि फसवणूक हे मोदी सरकारचे समानार्थी शब्द बनले आहेत. सरकारच्या टॅरिफ धोरणाबाबतच्या 'कुंभकर्णी झोपे'मुळे शेअर बाजारातील लहान आणि मोठ्या गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले आहे. ज्यामुळे बाजारात १९ लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे, असा आरोपही त्यांनी यावेळी केला. पुढे बोलताना खर्गे म्हणाले की, हे सरकार आपल्या कमतरता लपवण्यासाठी नवीन मार्ग शोधत आहे आणि त्यांच्या धोरणांमुळे देशाची आर्थिक स्थिती आणखी बिकट झाली आहे.