नवी दिल्ली : रमेश बिधुडी यांनी महिलांचा अपमान केला आहे तसेच केजरीवाल यांनीही तेच केले. विद्यमान मुख्यमंत्र्यांना तात्पुरत्या मुख्यमंत्री म्हणणे, हा महिलांचा आणि संवैधानिक पदावरील व्यक्तीचा अपमानच आहे, असे म्हणत काँग्रेस नेत्या आणि प्रवक्त्या अलका लांबा यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर टीका केली. तसेच अतिशी यांनी रडू नये तर लढावे, असे आवाहन देखील अलका लांबा यांनी केले.
अरविंद केजरीवाल यांच्या एका वक्तव्याचा हवाला देत अलका लांबा म्हणाल्या की, केजरीवाल यांनी अतिशी या दिल्लीच्या तात्पुरत्या मुख्यमंत्री आहेत, असे वक्तव्य केले. आतापर्यंत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री ही पदे माहिती होती. मात्र तात्पुरत्या मुख्यमंत्री ही नवी गोष्ट केजरीवाल यांनी सांगितली आणि मुख्यमंत्री पदावरील एका महिलेला तात्पुरत्या मुख्यमंत्री म्हणून या माध्यमातून केजरीवाल यांनीही महिलांचा अपमान केल्याचे लांबा म्हणाल्या. तसेच केजरीवाल १० वर्षे मुख्यमंत्री होते. मात्र त्यांच्या मंत्रिमंडळात एकही महिला मंत्री नव्हत्या. जेव्हा त्यांचे एक एक महत्त्वाचे मंत्री तुरुंगात जायला लागले तेव्हा त्यांनी महिलांना संधी दिली. जेव्हा स्वतः अरविंद केजरीवाल यांना तुरुंगात जावे लागले तेव्हा त्यांनी एका महिलेला मुख्यमंत्रीपदाची खुर्ची दिली, असेही लांबा म्हणाल्या.
राजधानी दिल्लीतील लक्षवेधी असलेल्या कालकाजी विधानसभा मतदारसंघातून मुख्यमंत्री अतिशी आम आदमी पक्षाच्या उमेदवार आहेत, अलका लांबा काँग्रेसच्या तर रमेश बिधुडी भाजप उमेदवार आहेत. काही दिवसांपूर्वी बिधुडी यांनी अतिशी यांच्या वडिलांबाबत बोलताना वादग्रस्त वक्तव्य केले होते. या पार्श्वभूमीवर अतिशी यांना विचारले असता त्यांना भर पत्रकार परिषदेत अश्रू अनावर झाले होते.