राष्ट्रीय

इंडिया आघाडीत ममता बॅनर्जी यांच्या सहभागावरून घटक पक्षांमध्ये संभ्रम

Shambhuraj Pachindre

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्याचे मतदान उरले असतानाच केंद्रात सत्ता स्थापन करण्याबाबतच्या हालचालींना वेग आला आहे. इंडिया आघाडीने पुढील रणनीती आखण्यासाठी १ जून रोजी बैठक बोलाविली आहे. मात्र, या बैठकीत हजर राहण्यास तृणमूल काँग्रेसने नकार दर्शविल्यामुळे इंडिया आघाडीतील या पक्षाच्या सहभागाविषयी मोठा संभ्रम निर्माण झाला आहे.

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर सत्तेसाठी कुठल्या आघाडीत सहभागी व्हायचे, हा पर्याय खुला ठेवण्याचा ममता बॅनर्जी यांचा विचार आहे. एकीकडे इंडिया आघाडीत सहभाग असल्याचे दाखवून दुसरीकडे या आघाडीपासून चार हात लांब रहायचे, अशा दुहेरी भूमिकेत ममता बॅनर्जी सध्या वावरत आहेत.

त्यामुळेच लोकसभा निवडणूक आणि राज्यात आलेल्या चक्रीवादळाच्या बचाव कार्यात व्यस्त असल्याचे सांगून ममता बॅनर्जी यांनी इंडिया आघाडीच्या बैठकीत उपस्थित राहण्यास असमर्थता दर्शवली आहे. त्यांचा कोणी प्रतिनिधीही बैठकीत सहभागी होणार नाही. त्यामुळे इंडिया आघाडीतील ममता बॅनर्जी यांच्या सहभागाबद्दल काँग्रेससह इतर घटक पक्षांना विश्वास वाटत नसल्याचे दिसून आले आहे.

ममता बॅनर्जी यांनी इंडिया आघाडीची बैठक ४ जूनला घेण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा केली आहे. पवार ३१ मे रोजी नवी दिल्लीत येणार आहेत. ममता बॅनर्जी यांच्याशी झालेल्या चर्चेची माहिती ते इंडिया आघाडीतील घटक पक्षांना देतील. मात्र, ममता बॅनर्जी यांच्या मागणीनुसार इंडिया आघाडीची १ जूनला होणारी बैठक पुढे ढकलली जाण्याची शक्यता कमी आहे.

पश्चिम बंगालमधील काँग्रेस नेते अधीररंजन चौधरी यांनी काही दिवसांपूर्वी तृणमूल काँग्रेसशी आघाडी करण्याबाबत ममता बॅनर्जी यांच्यावर विश्वास नाही, असे वक्तव्य केले होते. त्यावर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी आघाडी करण्याविषयी निर्णय घेण्याचे अधिकार चौधरी यांना नाहीत, असे सांगितल्यामुळे वाद निर्माण झाला होता. या वादानंतर खर्गे यांनी सारवासारव करून चौधरी हे जबाबदार नेते असल्याचे म्हटले होते.

ममता बॅनर्जी १९९९ मध्ये भाजपच्या एनडीए आघाडीत सामील झाल्या होत्या. अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये त्यांनी केंद्रीय रेल्वेमंत्रीपदही भूषविले होते. २००१ मध्ये एनडीएपासून वेगळे होऊन त्यांनी काँग्रेससोबत आघाडी करून पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक लढवली होती. मात्र, त्यानंतर पुन्हा २००३ मध्ये त्या एनडीएमध्ये सामील झाल्या होत्या. वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात त्यांचे सहकारी सुदीप बॅनर्जी यांचा समावेश होता. ममता बॅनर्जी आपण इंडिया आघाडीत असल्याचे सांगत असल्या तरीही सत्तेसाठी त्या पुन्हा एनडीए आघाडीत जाऊ शकतात, असे काँग्रेसला वाटू लागले आहे.

SCROLL FOR NEXT