नवीन शैक्षणिक धोरण 2020 Pudhari Photo
राष्ट्रीय

नवीन शैक्षणिक धोरणाबाबत तामिळनाडू आणि केंद्र सरकारमध्ये संघर्ष

पुढारी वृत्तसेवा

स्टॅलिनच्या आरोपांना शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचे उत्तर

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : नविन शैक्षणिक धोरणाबाबत तामिळनाडू आणि केंद्र सरकार यांच्यात आरोप-प्रत्यारोपांची लढाई सुरू आहे. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी एनईपीवरुन केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी न करणाऱ्या राज्यांशी केंद्र सरकार भेदभाव करत आहे, असा आरोप त्यांनी केला. या आरोपानंतर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी पलटवार केला आहे. आरोप फेटाळून लावत प्रधान यांनी राज्यातील विद्यार्थ्यांच्या हिताचे अनेक सवाल स्टॅलिन यांना केले आहेत.

नवे शैक्षणिक धोरण विचारविनिमयाने तयार

केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी ‘एक्स’वर पोस्ट करून म्हटले आहे की, नवे शैक्षणिक धोरण व्यापक विचारविनिमय करून तयार करण्यात आले आहे. प्रधान यांनी तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांना सवाल केले की, तुम्ही तामिळसह मातृभाषेतील शिक्षणाला विरोध करत आहात का? तामिळसह भारतीय भाषांमध्ये परीक्षा घेण्यास तुमचा विरोध आहे का? तामिळसह भारतीय भाषांमध्ये पाठ्यपुस्तके आणि साहित्य निर्मितीला तुमचा विरोध आहे का? तुमचा नव्या शैक्षणिक धोरणाच्या सर्वांगीण, बहुविद्याशाखीय, न्याय्य, भविष्यवादी आणि सर्वसमावेशक शिक्षणाला विरोध आहे का? जर विरोध नसेल तर तुमच्या राजकीय फायद्यापेक्षा तामिळनाडूच्या विद्यार्थ्यांच्या हिताला प्राधान्य देऊन धोरण लागू करा, असे केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी म्हटले आहे.

यापूर्वी तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी 'एक्स'वर एक पोस्ट केली होती. पोस्टमध्ये त्यांनी एनईपी लागू करण्यास नकार देणाऱ्या राज्यांसाठी केंद्राकडून शैक्षणिक निधीत कपात करण्यात येत असल्याची बातमी शेअर केली होती. एनईपी स्वीकारण्यास नकार दिल्याने सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या राज्यांना निधी नाकारण्यात आला आणि उद्दिष्टे पूर्ण न करणाऱ्या राज्यांना उदार हस्ते निधी देण्यात आला. दर्जेदार शिक्षण आणि समानता वाढवण्यासाठी केंद्रातील भाजप सरकारची अशीच योजना आहे का? असा सवाल त्यांनी केला होता.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT