नवी दिल्ली : हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्ससारख्या आस्थापनांमध्ये वापरल्या जाणाऱ्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरात शनिवारी जवळपास २०० रुपयांची कपात करण्यात आली. तर घरगुती एलपीजीच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही; मात्र प्रामुख्याने स्थलांतरित कामगारांची गरज भागवणाऱ्या ५-किलोच्या 'फ्री ट्रेड' एलपीजी किमतीत प्रति सिलिंडर सुमारे ४६ रुपयांची घट झाली आहे. त्याच वेळी, विमान इंधनाच्या (एटीएफ) दरात प्रति लिटर ५ रुपयांची वाढ करण्यात आली.
सरकारी तेल कंपन्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीमध्ये १९-किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरची किंमत आता २,७३८ रुपये झाली आहे, जी पूर्वी २,९३० रुपये होती. म्हणजेच दिल्लीत १९२ रुपयांनी व्यावसायिक एलपीजी सिलेंडर स्वस्त झाले. राष्ट्रीय राजधानीत ५ किलोचा 'फ्री ट्रेड' एलपीजी सिलेंडर ४६.५ रुपयांनी स्वस्त होऊन ७६२ रुपये प्रति सिलिंडर झाला आहे. तर एटीएफचे दर ११० रुपयांवरून वाढवून ११५ रुपये प्रति लिटर करण्यात आले आहेत.
विविध शहरांचे दर
मुंबईत व्यावसायिक वापराच्या एलपीजी दरात प्रति सिलेंडर १९४ रुपयांची कपात झाली आह यामुळे हा सिलिंडर २,६९१.५ रुपयांना उपलब्ध असेल. चेन्नईमध्ये व्यावसायिक वापराच्या एलपीजी सिलिंडरच्या दरात प्रति सिलेंडर २०० रुपयांची घट झाली असून, आता त्याची किंमत २,९०६ रुपये इतकी झाली आहे. प्रमुख महानगरांपैकी कोलकातामध्ये १९-किलोच्या सिलेंडरमागे सर्वाधिक, म्हणजेच २०९ रुपयांची कपात झाली आहे. आता या सिलिंडरची किंमत २,८७२.५ रुपये इतकी आहे.
दरम्यान, १ जुलै रोजी झालेल्या १८३.५ रुपयांच्या कपातीनंतर, व्यावसायिक एलपीजीच्या दरातील ही सलग दुसरी मासिक कपात आहे. एटीएफच्या बाबतीत, या बदलामुळे १ जुलै रोजी करण्यात आलेली कपात रद्द होऊन दर पुन्हा पूर्वीच्या पातळीवर आले आहेत. १ जुलै आणि १ ऑगस्ट रोजी व्यावसायिक एलपीजीच्या दरात झालेली ही कपात, पश्चिम आशियातील संकटामुळे जूनमध्ये दर विक्रमी पातळीवर पोहोचल्यानंतर करण्यात आली आहे.