LPG Price Hike:
नवी दिल्ली: दिवाळीच्या तोंडावरच सर्वसामान्य नागरिक आणि व्यावसायिकांना महागाईचा फटका बसला आहे. आजपासून (१ नोव्हेंबर) व्यावसायिक वापराच्या एलपीजी सिलिंडरच्या किमतीत वाढ करण्यात आली आहे. तसेच मुंबईत सीएनजीच्या दरातही प्रतिकिलो १ रूपयांची वाढ झाली आहे.
व्यावसायिक सिलिंडरच्या दरांत गेल्या काही महिन्यांतही वाढ झाली होती. आता १ नोव्हेंबरपासून व्यावसायिक सिलिंडर १० रुपयांनी महागला असून मुंबईत व्यावसायिक सिलिंडर २ हजार ७७४ रुपयांवर पोहचला आहे. दिल्लीत १९ किलोच्या कमर्शियल सिलिंडरची किंमत २,८१० रुपयांवरून वाढवून २,८२० रुपये करण्यात आली आहे. मात्र, दिलासादायक बाब म्हणजे १४.२ किलो वजनाच्या घरगुती एलपीजी सिलिंडरचे दर अद्याप स्थिर ठेवण्यात आले आहेत. घरगुती वापराच्या सिलिंडरची किंमत ९४२ रुपयांवर कायम आहे. यापूर्वी १ ऑक्टोबर रोजीही दिल्लीत कमर्शियल सिलिंडरच्या किमतीत ६२.५० रुपयांची वाढ झाली होती.
सीएनजीच्या दरात प्रतिकिलो १ रुपयाने वाढ झाली असून सीएनजीचा नवा दर प्रतिकिलो ९० रुपये झाला आहे. मध्य पूर्वेतील युद्धजन्य परिस्थितीमुळे नैसर्गिक वायूच्या किमतीत वाढ झाल्याचे सांगितले जात आहे.
चेन्नई: येथे कमर्शियल सिलिंडरची किंमत २,९८३ रुपयांवरून वाढून २,९९४.५० रुपये झाली आहे. म्हणजेच, ११.५० रुपयांची वाढ झाली आहे. घरगुती सिलिंडरचे दर ९५७.५० रुपयांवर स्थिर आहेत.
मुंबई: मुंबईत कमर्शियल सिलिंडरची किंमत २,७६४ रुपये, तर घरगुती सिलिंडरची किंमत ९४१.५० रुपये आहे.
अहमदाबाद: येथे कमर्शियल सिलिंडरची किंमत २,८३१.५० रुपयांवरून वाढून २,८४२ रुपये झाली आहे. म्हणजेच, १०.५० रुपयांची वाढ झाली आहे. घरगुती सिलिंडरची किंमत ९४९ रुपयांवर स्थिर आहे.
शिलांग आणि पटना: शिलांगमध्ये घरगुती सिलिंडरची किंमत १,००७.५० रुपये, तर कमर्शियल सिलिंडरची किंमत ३,०९१ रुपये झाली आहे. तसेच, बिहारमधील पटनामध्ये कमर्शियल सिलिंडरची किंमत ३,१३२ रुपये, तर घरगुती सिलिंडरची किंमत १,०४० रुपयांवर स्थिर आहे.
लखनऊ: उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये घरगुती सिलिंडरची किंमत ९७९.५० रुपयांवर कायम आहे. मात्र, कमर्शियल सिलिंडरची किंमत वाढून २,९४२ रुपये झाली आहे.
हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, ढाबे, केटरिंग सेवा आणि इतर व्यावसायिक आस्थापनांमध्ये १९ किलोच्या कमर्शियल एलपीजी सिलिंडरचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. सिलिंडरच्या किमतीत वाढ झाल्यामुळे या व्यावसायिक आस्थापनांच्या खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे. मात्र, या दरवाढीचा हॉटेलमधील खाद्यपदार्थांच्या किमतींवर नेमका किती परिणाम होईल, हे इतर व्यावसायिक परिस्थिती आणि खर्चातील बदलांवर अवलंबून असेल.
इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या ऐतिहासिक आकडेवारीनुसार, गेल्या १२ वर्षांत कमर्शियल सिलिंडरच्या दरांत मोठे चढ-उतार पाहायला मिळाले आहेत. नोव्हेंबर २०१४ मध्ये दिल्लीत १९ किलोच्या सिलिंडरची किंमत १,४४९ रुपये होती. नोव्हेंबर २०२५ मध्ये ही किंमत १,५९०.५० रुपयांवर होती. मात्र, नोव्हेंबर २०२६ मध्ये हाच सिलिंडर २,८२० रुपयांवर पोहोचला आहे.