नवी दिल्ली : पश्चिम आशियात सुरू असलेल्या संघर्षाचा परिणाम आता सामान्य जीवन आणि व्यापारावर थेट दिसू लागला आहे. बुधवारी व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतीत मोठी वाढ करण्यात आली. 19 किलोच्या सिलिंडरच्या दरात 10 टक्क्यांहून अधिक म्हणजे जवळपास 195 रुपये 50 पैशांची वाढ झाल्याने हॉटेल्स, रेस्टॉरंटस् आणि छोट्या व्यापाऱ्यांवर अतिरिक्त आर्थिक बोजा पडला आहे.
दिल्लीत व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत आता 2,078.50 रुपये झाली आहे. कोलकाता येथे ही किंमत 2,208 रुपये, मुंबईत 2,031 रुपये आणि चेन्नईमध्ये 2,246.50 रुपयांवर पोहोचली आहे. सर्वात मोठी वाढ कोलकात्यात नोंदवण्यात आली आहे. मात्र, सामान्य ग्राहकांसाठी दिलासादायक बाब म्हणजे, घरगुती स्वयंपाकाच्या गॅसच्या किमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. दिल्लीत 14.2 किलोचा घरगुती गॅस सिलिंडर 913 रुपयांवर स्थिर आहे. तरीही, मार्च महिन्यातच किमतीत 60 रुपयांची वाढ झाल्यामुळे घरगुती गॅस आधीच महागलेला आहे.