राष्ट्रीय

व्यावसायिक गॅस सिलिंडर 209 रुपयांनी महागला

Arun Patil

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : सरकारी तेल कंपन्यांनी ऐन सणासुदीच्या काळात 19 किलो वजनाच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत रविवारपासून (1 ऑक्टोबर) 209 रुपयांनी वाढवली आहे. त्यामुळे विविध व्यावसायिकांना त्याचा मोठा फटका बसणार आहे.

या दरवाढीनुसार राजधानी दिल्लीत आता व्यावसायिक सिलिंडरची किंमत 1731.50 रुपये झाली आहे. घरगुती गॅसच्या सिलिंडरमध्ये मात्र कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. काही दिवसांपूर्वीच या गॅस सिलिंडरच्या किमतीत दोनशे रुपयांची कपात करण्यात आली होती.

व्यावसायिक सिलिंडरच्या दरवाढीमुळे सामान्य माणसालाही मोठा फटका बसणार आहे. कारण, त्यामुळे प्रामुख्याने खाण्या-पिण्याच्या वस्तू महाग होणे अटळ आहे.

यंदाच्या 1 सप्टेंबर रोजी सरकारी तेल कंपन्यांनी व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत 158 रुपयांची कपात केली होती. त्यामुळे या सिलिंडरची किंमत 1522 रुपये झाली होती. त्यापूर्वी ऑगस्टमध्ये याच सिलिंडरच्या किमतीत 99.75 रुपयांची कपात करण्यात आली होती.

म्हणजेच गेल्या दोन महिन्यांत व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत 258 रुपयांनी घटविण्यात आली होती. तथापि, आता प्रामुख्याने रेस्टॉरंट आणि हॉटेलमध्ये खाद्यपदार्थांसाठी जादा रक्कम ग्राहकांना मोजावी लागेल.

SCROLL FOR NEXT