राष्ट्रीय

कॉलेज प्रवेश होणार आता वर्षातून दोनदा

Arun Patil

मुंबई / नवी दिल्ली : भारतातील महाविद्यालयांमध्ये उच्च शिक्षणासाठी आता महाविद्यालयांमध्ये आणि विद्यापीठांमध्येही वर्षातून दोनवेळा प्रवेश प्रक्रिया राबवता येणार आहे.

विद्यापीठ अनुदान आयोगाचे (यूजीसी) अध्यक्ष जगदीश कुमार यांनी यास मंजुरी दिली असून, त्यामुळे नव्या शैक्षणिक वर्षासाठी जुलै-ऑगस्ट किंवा जानेवारी-फेब्रुवारी असे दोन प्रवेश पर्याय यापुढे उपलब्ध असतील. यापैकी कधीही प्रवेश घेता येईल.

आतापर्यंत 'यूजीसी'ने फक्त ऑनलाईन आणि दूरस्थ शिक्षणाच्या अभ्यासक्रमांसाठीच वर्षातून दोनवेळा प्रवेश देण्याची मुभा दिली होती. आता ही मुभा ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही अभ्यासक्रमांना मिळेल. अर्थात, वर्षातून दोनवेळा प्रवेश देणे अनिवार्य नाही. संबंधित विद्यापीठांनी व महाविद्यालयांनी आपापला निर्णय घ्यायचा आहे, असे जगदीश कुमार यांनी मंगळवारी सांगितले. ज्या विद्यापीठांकडे किंवा शैक्षणिक संस्थांकडे आपली पुरेशी साधने किंवा शिक्षक उपलब्ध आहेत. अशी सर्व विद्यापीठे ही या निर्णयाची अंमलबजावणी करू शकतात, असेही जगदीश कुमार यांनी स्पष्ट केले आहे.

दोन वेळा प्रवेश प्रक्रिया राबवण्याच्या निर्णयामुळे महाविद्यालयांना विद्यार्थी संख्या वाढवण्याची संधी मिळेल तसेच भविष्यवेधी अभ्यासक्रमही सुरू करता येतील. वर्षातून दोनदा प्रवेशाची पद्धत सुरू करण्याआधी संबंधित संस्थांना त्यांच्या नियमांत बदल करून घ्यावे लागणार आहेत.

जगभरातील विद्यापीठांमध्ये यापूर्वीच वर्षभरात दोन वेळा प्रवेश प्रक्रिया राबविली जाते. भारतीय विद्यापीठेदेखील या प्रणालीचा अवलंब करत असतील, तर आपल्या आंतरराष्ट्रीय सहयोग आणि विद्यार्थ्यांच्या देवाण-घेवाणीसही मदत होईल. जागतिक शिक्षण क्षेत्रातील वैश्विक प्रतिस्पर्धेमध्येदेखील सुधारणा होणार असल्याचे जगदीश कुमार यांनी म्हटले आहे.

'यूजीसी'ने ऑनलाईन आणि दूरस्थ अभ्यासक्रमांसाठी वर्षातून दोन वेळा प्रवेशाची सुविधा दिल्याने विद्यार्थ्यांची संख्या वाढली. 'यूजीसी'च्या आकडेवारीनुसार जुलै 2022 मध्ये एकूण 19 लाख 73 हजार 56 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता. जानेवारी 2023 मध्ये त्यात 4 लाख 28 हजार 854 विद्यार्थ्यांची भर पडली. त्यामुळे शिक्षणासाठी पुढील वर्षाची वाट न पाहता सुमारे पाच लाख विद्यार्थ्यांना लगेच संधी मिळाली.

* दोनदा प्रवेशाचा फायदा विद्यार्थ्यांना. बोर्डाच्या निकालांना विलंब, वैयक्तिक कारणाने प्रवेशापासून वंचित राहणार्‍यांना संधी.

* काही विद्यार्थी चालू सत्रात प्रवेश घेण्यापासून वंचित राहतील; त्यांना संपूर्ण वर्षभर न थांबता पुढील सत्रात तत्काळ प्रवेश मिळणार आहे.

* उद्योग जगतातील कंपन्यादेखील आपली कर्मचारी भरतीची प्रक्रिया वर्षातून दोन वेळा राबवू शकणार.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT