नवी दिल्ली : "कॉकरोच जनता पार्टी"च्या कारवायांची केंद्रीय अन्वेषण विभागामार्फत (सीबीआय) चौकशी केली जावी, या मागणीसाठी सर्वोच्च न्यायालयात एक जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. तसेच देशातील बनावट वकिलांची देखील सीबीआय चौकशी करण्याची मागणी देखील या याचिकेत करण्यात आली आहे. वकील राजा चौधरी यांनी ही याचिका दाखल केली आहे.
याचिकेत, सर्वोच्च न्यायालयासमोर अलीकडेच पार पडलेल्या सुनावण्यांदरम्यान न्यायालयाने तोंडी स्वरूपात केलेल्या निरीक्षणांचे व्यावसायिक आणि आर्थिक फायद्यासाठी केलेला प्रसार याविरोधातही कारवाईची मागणी करण्यात आली आहे.
याचिकेनुसार, न्यायालयातील सुनावणीदरम्यान झालेल्या संवादांमध्ये वापरलेले काही रूपकात्मक "कॉकरोच" संदर्भ नंतरच्या काळात निवडकपणे कापले गेले. त्यांचे 'मीम्स' बनवले गेले, नक्कल केली गेली आणि घटनात्मक व कायदेशीर कार्यपद्धतीच्या संदर्भापासून पूर्णपणे विलग करून, त्याचा व्यावसायिक हेतूने वापर केला गेला.
या याचिकेत स्पष्ट करण्यात आले आहे की, ही याचिका न्यायपालिकेवरील टीका, लोकशाही मार्गाने विरोध दर्शवणे, व्यंग किंवा संविधानाच्या अनुच्छेद १९(१)(अ) अंतर्गत संरक्षित भाषण स्वातंत्र्याच्या विरोधात नाही. उलट, यात संघटित व्यावसायिक शोषण, ट्रेडमार्कचे व्यापारीकरण, पैशात रूपांतरित होणारा व्हायरल प्रसार, मीम-आधारित विपर्यास आणि तोंडी न्यायालयीन कामकाजाचे डिजिटल व्यापारीकरण केल्याचा आरोप करण्यात आला आहे.