CM Vijay removes Astrologer Vetrivel
चेन्नई : तामिळनाडूतील सत्ताधारी टीव्हीके (TVK) पक्षाने आज (दि. १३) सकाळी विश्वासदर्शक ठराव जिंकला. यानंतर मुख्यमंत्री विजय यांनी ज्योतिषी राधन पंडित वेत्रीवेल यांची 'विशेष कार्य अधिकारी' (राजकीय) म्हणून केलेली नियुक्ती रद्द केली आहे.
टीव्हीकेचे प्रमुख्य प्रमुख आणि मुख्यमंत्री जोसेफ विजय यांनी मंगळवारी ज्योतिषी राधन पंडित वेत्रीवेल यांची 'विशेष कार्य अधिकारी' (राजकीय) म्हणून नियुक्ती केली होती. मात्र या नियुक्तीला टीव्हीकेचे टीकाकार, विरोधी पक्ष आणि महत्त्वाचा मित्रपक्ष असलेल्या 'विदुथलाई चिरुथाईगल कात्ची' (VCK) ने तीव्र विरोध दर्शवला होता. विशेष म्हणजे, VCK ने मुख्यमंत्र्यांना पाठिंबा देण्यासाठी आपल्या दोन जागा देऊ केल्या आहेत.
वेत्रीवेल यांनी विजय यांच्या विजयाची भविष्यवाणी केली होती. त्यांच्याच सल्ल्यानुसार विजय यांनी शपथविधीची वेळ बदलली होती. टीव्हीके नेते सी.टी. निर्मल कुमार यांनी पत्रकारांना सांगितले होते की, वेत्रीवेल हे मीडिया प्रवक्ते म्हणून काम पाहणार आहेत. त्यानंतर हा गदारोळ अधिक वाढला. अखेर त्यांची 'ओडीसी'पदी केलेली नियुक्ती मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला.या वादावर स्पष्टीकरण देताना निर्मल कुमार म्हणाले की, "वेत्रीवेल हे आमचे मीडिया समन्वयक आणि प्रवक्ते आहेत. ते कोणत्याही व्यवसायाचे असू शकतात, परंतु त्यांची नियुक्ती मीडिया सांभाळण्यासाठी करण्यात आली होती. त्यांच्या व्यवसायाचा या नियुक्तीशी कोणताही संबंध नाही, निर्मल कुमार यांनी स्पष्ट केले आहे.
तमिळनाडूतील एक प्रख्यात ज्योतिष मार्गदर्शक म्हणून वेट्रिवेल यांची ओळख आहे. त्यांनी निवडणुकीपूर्वीच विजय यांच्या विजयाची भविष्यवाणी केली होती. केवळ विजयच नव्हे, तर दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांच्यासह अनेक दिग्गज राजकारणी वेट्रिवेल यांच्या सल्ल्यासाठी त्यांच्या कार्यालयाबाहेर रांगा लावत असत. TVK पक्षाचा विजय झाल्यानंतर विजय यांचे अभिनंदन करण्यासाठी पोहोचलेल्या पहिल्या काही व्यक्तींमध्ये वेट्रिवेल यांचा समावेश होता.
गेल्या चार दशकांपासून ज्योतिष क्षेत्रात कार्यरत असलेल्या राधन पंडित वेत्रीवेल यांनी अनेक बड्या नेत्यांचे भविष्य वर्तवले आहे. मात्र, त्यांनी स्वतःच्या राजकारणातील प्रवेशाचे भाकीत वर्तवले होते का, हे अद्याप अस्पष्ट आहे. राजकीय विश्लेषकांच्या मते, माजी मुख्यमंत्री जयललिता अनेकदा वेट्रिवेल यांच्याशी सल्लामसलत केल्यानंतरच महत्त्वाचे निर्णय घेत असत. याशिवाय ते सोशल मीडियाच्या माध्यमातूनही लोकांना ज्योतिषीय सल्ला देतात. आता तामिळनाडूतील सत्ताधारी टीव्हीके (TVK) पक्षाचे मीडिया समन्वयक आणि प्रवक्ते झाले आहेत.
तमिळनाडू विधानसभा निवडणुकीत 'तमिळगा वेत्री कळघम' (TVK) पक्षाने २३४ पैकी १०८ जागा जिंकून दमदार कामगिरी केली. विजय यांना स्पष्ट बहुमताचा आकडा गाठता आला नाही, तरी काँग्रेस आणि VCK सारख्या पक्षांनी पाठिंबा दिल्यामुळे त्यांचा मुख्यमंत्री होण्याचा मार्ग मोकळा झाला.