मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Pudhari File Photo
राष्ट्रीय

दिल्लीच्या संकट काळात मराठी माणूस मदतीला धावला : मुख्यमंत्री फडणवीस

दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपच्या प्रचाराला फडणवीसांची उपस्थिती

पुढारी वृत्तसेवा
प्रशांत वाघाये

नवी दिल्ली : 'जेव्हा जेव्हा दिल्ली संकटात होती तेव्हा तेव्हा मराठी माणूस दिल्लीच्या मदतीसाठी धावून आला. पुन्हा एकदा संकटात असलेल्या दिल्लीला संकटातून बाहेर काढण्यासाठी सगळे मराठीजण एक होतील आणि दिल्ली सरकारला सत्तेतून खाली खेचतील', असे म्हणत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्ली सरकारवर जोरदार हल्ला चढवला. यासाठी त्यांनी इतिहासातील लढायांची उदाहरणेही दिली.

दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तीन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. पहिल्या दिवशी त्यांनी विविध ठिकाणी प्रचारसभांसह दिल्ली भाजपच्या मराठी विभागाच्या वतीने आयोजित सभेला हजेरी लावली. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला देवेंद्र फडणवीस यांच्यासह केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, माजी केंद्रीय मंत्री भागवत कराड, उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री रमेश पोखरीयाल, खासदार बासूरी स्वराज, भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस दृष्यंत गौतम, महेंद्र लद्धा, श्रीराम जोशी, नितीन सरदारे उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सत्कारही करण्यात आला.

यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी आपचे नेते अरविंद केजरीवाल यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले. अरविंद केजरीवाल हे बेईमान नेते आहेत, असे स्वतः अन्ना हजारे म्हणाले आहेत. आता 'आपदा नही सहेंगे' हे दिल्लीकर नागरिकांनी ठरवले आहे. या भूमिकेला दिल्लीतील मराठी माणूस पूर्ण ताकदीने प्रतिसाद देईल, असेही फडणवीस म्हणाले. कार्यक्रमात व्यक्त करण्यात आलेल्या विविध मागण्यांच्या संदर्भात राज्य सरकार आणि मुख्यमंत्री म्हणून मी स्वतः लक्ष घालणार आहे. दिल्लीत मराठीजणांच्या पाठीशी उभे राहणे हे माझे कर्तव्य आहे, असेही फडणवीस म्हणाले.

दिल्ली हे राजधानीचे शहर आहे मात्र सर्वात प्रदूषित आहे. यमुना नदीची परिस्थिती आपल्याला माहिती आहे. दिल्लीला आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रदूषणमुक्त शहर बनवायचे असेल, यमुना प्रदूषण मुक्त करायची असेल, चांगल्या पायाभूत सुविधा हव्या असतील तर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात दिल्लीत भाजपला निवडावे लागेल, असेही फडणवीस म्हणाले.

... तर तिथे आपच्या नेत्यांना मेडल : फडणवीस

देशात आणि जगात अनेक स्पर्धा भरवल्या जातात. खोटे बोलण्याची किंवा भ्रष्टाचार करण्याची एखादी स्पर्धा जगाच्या पाठीवर भरवली. तर त्यामध्ये आपच्या नेत्यांचा पहिला क्रमांक येईल. जे झोपडीत राहायच्या गोष्टी करायचे ते महालात राहायला गेले. तिथल्या वस्तूंच्या किमती अनेक गर्भ श्रीमंतांना लाजवतील, अशा आहेत, असे म्हणत फडणवीस यांनी आम आदमी पक्षावर टीकेची झोड उठवली.

मुंबई, महाराष्ट्रात विकास झाला कारण...

देशभरातील, जगभरातील लोक मुंबई आणि महाराष्ट्रात येतात. तिथे आल्यानंतर कोस्टल रोड, अटलसेतू, नवे विमानतळ पाहतात, तिथल्या पायाभूत सुविधा पाहतात आणि ते बघून चकित राहतात. तिथे या सगळ्या गोष्टी होऊ शकल्या कारण पंतप्रधान नरेंद्र मोदींचे पाठबळ आणि राज्यात भाजप प्रणित महायुतीचे सरकार आहे, त्यामुळे हे होऊ शकले, हे दिल्लीतही होऊ शकते. मात्र त्यासाठी परिवर्तनाची गरज आहे. दिल्लीतही पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपला निवडण्याची गरज आहे, असे म्हणत फडणवीस यांनी मुंबई आणि महाराष्ट्रातील विकास कामांचे उदाहरण दिले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT