कोलकाता : मुसळधार पावसात रस्त्यावरून मार्ग काढताना वाहने, नागरिक.  (छायाचित्र : पीटीआय)
राष्ट्रीय

Jammu Kashmir Cloudburst | काश्मीरमध्ये ढगफुटी; उत्तराखंडात भूस्खलन

देशभरात मुसळधार पावसाचा कहर; छत्तीसगडमध्ये पूल तुटला

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : देशातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले असून पूर, ढगफुटी, भूस्खलन आणि नदीपात्र धोक्याच्या पातळीवर पोहोचल्याने नागरिकांना मोठ्या संकटाला सामोरे जावे लागत आहे. जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा येथे ढगफुटीमुळे आलेल्या पुरात एका महिलेचा मृत्यू झाला असून, उत्तराखंडमध्ये भूस्खलनामुळे यमुनोत्री राष्ट्रीय महामार्ग अनेक ठिकाणी बंद झाला आहे.

उत्तराखंडात महामार्ग बंद

उत्तराखंडच्या उत्तरकाशी जिल्ह्यात सततच्या पावसामुळे अनेक ठिकाणी भूस्खलन झाले आहे. त्यामुळे यमुनोत्री राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला असून यात्रेकरू आणि पर्यटकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. रुद्रप्रयाग जिल्ह्यातही दरडी कोसळण्याचा धोका वाढल्याने प्रशासन सतर्क झाले आहे.

छत्तीसगडमध्ये पूल कोसळला

छत्तीसगडमध्ये बिलासपूर-रतनपूर-पेंड्रा मार्गावरील पूल दोन भागांत तुटला. याच वेळी पुलावरून जात असलेली प्रवासी बस मध्येच अडकली. सुदैवाने मोठी जीवितहानी टळली असून प्रशासनाने तत्काळ मदतकार्य सुरू केले.

उत्तर प्रदेशात रस्त्यांवर नौका

उत्तर प्रदेशातील गंगा, घाघरा, शारदा यांच्यासह दहा नद्या धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत. बिजनौर जिल्ह्यात गंगेचे पाणी सहा गावांत शिरल्याने अनेक रस्ते पाण्याखाली गेले असून काही ठिकाणी वाहतुकीसाठी नौकांचा वापर करावा लागत आहे. राज्यातील सर्व ७५ जिल्ह्यांसाठी पावसाचा इशारा देण्यात आला असून गोरखपूर, सीतापूरसह १८ जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

बिहार, राजस्थान, मध्य प्रदेशातही पावसाचा प्रभाव

बिहारची राजधानी पाटणा आणि इतर अनेक भागांत सोमवारी सकाळपासून जोरदार पाऊस सुरू आहे. राज्यातील २५ जिल्ह्यांसाठी वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. बेगूसरायमध्ये मुसळधार पावसानंतर रस्त्यांवर तीन फूट पाणी साचले. राजस्थानमध्ये जयपूरसह अनेक भागांत हलका पाऊस झाला असून तापमानात चार अंश सेल्सिअसपर्यंत घट झाली आहे. पुढील आठवडाभर मान्सून काहीसा कमकुवत राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मध्य प्रदेशात आतापर्यंत सरासरी १५.४ इंच पाऊस झाला असला तरी तो हंगामी सरासरीच्या निम्म्याहून कमी आहे. पुढील दोन दिवस राज्यात अतिवृष्टीची शक्यता नसल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे.

कोलकात्यात ‘यलो अलर्ट’

पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथेही पावसाचा जोर कायम असून ६ ऑगस्टपर्यंत ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. पुढील दोन दिवस मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT