जम्मू : ढगफुटीमुळे प्रचंड वेगाने वाहणाऱ्या पाण्याच्या प्रवाहातून शेकडो वाहने वाहून गेली. 
राष्ट्रीय

Kashmir Cloudburst | काश्मीरमध्ये अनेक ठिकाणी ढगफुटीचा कहर; १६ जणांचा मृत्यू, अनेक बेपत्ता

नागालँडमध्ये दरड कोसळून आठजणांचा मृत्यू

पुढारी वृत्तसेवा

अनिल एस साक्षी

जम्मू : जम्मू-काश्मीरमध्ये ढगफुटी आणि मुसळधार पावसाने प्रचंड हाहाकार माजवला आहे. अनेक ठिकाणी झालेल्या ढगफुटीमुळे आणि मुसळधार पावसामुळे १६ हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. अनेक लोक अद्याप बेपत्ता आहेत.

पूंछ आणि राजौरी या सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसामुळे आलेला अचानक पूर आणि भूस्खलनामुळे मृतांची संख्या रविवारी वाढून १६ झाली आहे, तर अनेकजण अजूनही बेपत्ता आहेत. बचाव पथके अत्यंत प्रतिकूल हवामानाशी सामना करत बाधित भागांपर्यंत पोहोचण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहेत. सर्वात जास्त नुकसान सुरनकोट येथे झाले असून तिथे एकाच कुटुंबातील ८ सदस्यांसह ९ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. यात एका २ वर्षांच्या चिमुरड्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे. हवेली भागात एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून अनेकजण बेपत्ता आहेत. राजौरीमध्ये २०० ते २५० वाहने वाहून गेली आहेत.

नागालँडमध्ये भूस्खलन; आठ जणांचा मृत्यू

दुसरीकडे, नागालँडमध्येही मुसळधार पावसामुळे भूस्खलनाची मोठी दुर्घटना घडली आहे. मोन जिल्ह्यात रविवारी सकाळी झालेल्या भूस्खलनात १० ते १५ घरे ढिगाऱ्याखाली गाडली गेली. या दुर्घटनेत आतापर्यंत आठ जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण अद्याप बेपत्ता असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. घटनेनंतर पोलिसांची पथके घटनास्थळी दाखल झाली असून युद्धपातळीवर बचाव आणि मदतकार्य सुरू आहे. प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून हवामान विभागाने पुढील काही दिवस अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT