नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशातील सुमारे ६० टक्के भागावर पुन्हा एकदा पावसाचे ढग दाटून आले असून, पुढील काही दिवस उत्तर, मध्य आणि पूर्व भारतात मुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे उत्तर प्रदेश, बिहार आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये पुढील सात दिवस जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान, अरुणाचल प्रदेशात पूरस्थिती गंभीर असून भूस्खलनाच्या घटनाही घडत आहेत. उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, झारखंड, ओडिशा, पश्चिम बंगाल, छत्तीसगड आणि ईशान्येकडील राज्यांसाठीही मुसळधार पावसाचा इशारा जारी करण्यात आला आहे. बिलासपूरमध्ये मुसळधार पावसामुळे शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे, तर उत्तराखंडमध्ये अनेक रस्ते बंद झाले आहेत. दुसरीकडे, तामिळनाडूमध्ये पाऊस कमी झाल्याने उष्णतेची लाट कायम असून तेथे हीटवेव्हचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.
विषुववृत्ताजवळ
हवामान प्रणाली सक्रिय
हवामान तज्ज्ञांच्या माहितीनुसार, विषुववृत्ताजवळ आणखी एक हवामान प्रणाली सक्रिय होत असून, २० ते ३० जुलैदरम्यान मध्य प्रदेशासह उत्तर आणि मध्य भारतात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. मान्सून ट्रफ पुन्हा
सक्रिय झाल्याने तसेच बंगालच्या उपसागरातून मोठ्या प्रमाणात ओलावा येत असल्याने अनेक भागांत पावसाची तीव्रता वाढत आहे.