Lok Sabha Speaker removal motion | लोकसभा अध्यक्षांना हटवण्याच्या प्रस्तावावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी 
राष्ट्रीय

Lok Sabha Speaker removal motion | लोकसभा अध्यक्षांना हटवण्याच्या प्रस्तावावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी

गौरव गोगोईंनी केला पक्षपाताचा आरोप; किरेन रिजिजू यांनी दावे फेटाळले

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली : लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पदावरून हटवण्यासाठी आणलेल्या प्रस्तावावरील चर्चेदरम्यान मंगळवारी संसदेत सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. काँग्रेस खासदार मोहम्मद जावेद यांनी सभागृहात हा प्रस्ताव मांडला, तर चर्चेची सुरुवात काँग्रेसचे उपनेते गौरव गोगोई यांनी केली. गोगोई यांनी अध्यक्षांवर पक्षपाती वृत्तीने वागल्याचा आणि विरोधकांचा आवाज दाबल्याचा गंभीर आरोप केला. दुसरीकडे, संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावत, सभागृहाचे कामकाज नियमांनुसारच चालते, असे ठामपणे सांगितले. याचवेळी प्रियांका गांधी यांनी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची जोरदार पाठराखण केली.

गोगोईंचे गंभीर आरोप

चर्चेची सुरुवात करताना गौरव गोगोई म्हणाले की, अध्यक्षांची भूमिका निष्पक्ष राहिलेली नाही. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना महत्त्वाच्या मुद्द्यांवर बोलण्यासाठी पुरेशी संधी दिली जात नाही. अनेकदा विरोधी खासदारांचे माईक बंद केले जातात, असा दावाही त्यांनी केला. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रदर्शनाच्या वेळी राहुल गांधी यांना सुमारे 20 वेळा रोखण्यात आले, तसेच शशी थरूर यांचे भाषण सुरू असताना माईक बंद करण्यात आला. हे संसदीय परंपरेच्या विरोधात आहे, असेही गोगोई यांनी नमूद केले.

रिजिजूंचा पलटवार

संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी विरोधकांना चोख प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, सभागृहात बोलण्यासाठी अध्यक्षांची परवानगी अनिवार्य असते आणि नियमांशिवाय कोणताही सदस्य बोलू शकत नाही. काही लोक स्वतःला संविधानापेक्षा मोठे समजू लागले आहेत. विरोधकांनाही प्रश्न विचारण्याची मोठी संधी देण्यात आली आहे, असेही त्यांनी नमूद केले.

असा नेता पाहिला नाही; राहुल गांधींवर टीका

रिजिजू यांनी 2018 मधील एका घटनेची आठवण करून दिली, जेव्हा अविश्वास प्रस्तावावरील चर्चेनंतर राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींची गळाभेट घेतली होती आणि नंतर आपल्या जागेवर येऊन डोळा मिचकावला होता. पंतप्रधानांना मिठी मारून पुन्हा जागेवर जाऊन सहकार्‍यांना डोळा मारणारा नेता मी कधीही पाहिला नाही, असा टोला रिजिजू यांनी लगावला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT