ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत आणि शिंदे गटाचे खासदार मिलिंद देवरा यांच्यात जुंपली.  Pudhari News Network
राष्ट्रीय

दिल्लीत मिलिंद देवरा- अरविंद सावंतांमध्ये जुंपली

Milind Deora on Arvind Sawant | मुंबईच्या विविध प्रकल्पावरून आरोपप्रत्यारोप

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि वरळीचे आमदार आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघासह मुंबईच्या विविध प्रकल्पावरून ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत आणि शिंदे गटाचे खासदार मिलिंद देवरा यांच्यात जुंपल्याचे पाहायला मिळाले. सुरुवातीला मिलिंद देवरा यांनी वरळीत दौरा केल्याचे सांगितले. तर आदित्य ठाकरे वरळीत निवडूनही आले आणि त्यांचे वरळीसह महाराष्ट्रावरही लक्ष आहे, असे अरविंद सावंत म्हणाले. (Milind Deora on Arvind Sawant)

वरळीत आम्हाला ट्विटर आमदार नको

दिल्लीत माध्यमांशी बोलताना खासदार मिलिंद देवरा म्हणाले की, मी शनिवारी वरळी मतदारसंघात भेटी देऊन आलो. तिथल्या लोकांनी सांगितले की आम्हाला ट्विटर आमदार नको तर आम्हाला जमिनीवरचे आमदार हवेत. वरळीत मूळ मराठी समाज राहतो आणि तिथे अरविंद सावंत यांना फक्त ६ हजाराचे लीड मिळाले. येत्या विधानसभा निवडणुकीत जनता यावेळी खऱ्या शिवसेनेला मान्यता देईल. अरविंद सावंत १० वर्ष खासदार आहेत आणि ते कोणाच्या मतांवर जिंकले, हे सगळ्यांना माहीत आहेत, असे म्हणत देवरांनी सावंतांना डिवचले. तसेच माझे वडील आणि मी खासदार असताना अनेक लोकांना घर दिली. मात्र, सावंतांनी चाळीत राहणाऱ्या किती लोकांना घरे दिली, या भागात राहणाऱ्या मूळ रहिवाशांसाठी काय केले, असा प्रश्नही विचारला. (Milind Deora on Arvind Sawant)

बहिणींसाठी त्यांनी काहीच केले नाही

राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेवर बोलताना देवरा म्हणाले की, लाडकी बहीण योजनेबाबत मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय आला. बहिणींसाठी ज्यांनी काहीच केले नाही, ते यावर बोलत आहेत. मुख्यमंत्र्यांनी ग्रामीण भागातील महिलांचे हात बळकट करण्यासाठी योजना लागू केली होती. मात्र, काही लोक न्यायालयात गेले, त्यांना न्यायालयाने चपराक दिली. (Milind Deora on Arvind Sawant)

महाविकास आघाडी विरोधात काही जणांना स्पॅान्सर

मिलिंद देवरा यांच्या वक्तव्याला प्रत्युत्तर देताना ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत म्हणाले की, जे टिवटिव करतात त्यांनी बंद करावे, टिवटिव करणारे कोविड काळात कुठे होते, पावसात जशा आळम्या येतात, तसे ते आले आहेत. महाविकास आघाडी विरोधात काही जणांना स्पॅान्सर केले असल्याचा सणसणीत टोलाही त्यांनी देवरांनी लगावला. आदित्य ठाकरेंविषयी बोलताना सावंत म्हणाले की, आदित्य ठाकरे वरळीतून निवडून आले आहेत आणि त्यांचे महाराष्ट्रावरही लक्ष आहे. त्यांच्यामुळे अनेक विषयावर महापालिकेला माघार घ्यावी लागल्याचे सावंत म्हणाले. तसेच मुंबईच्या विकासाचे संकल्पचित्र उद्धव ठाकरेंनी दाखवले होते. हा विकास कोणी थांबवला. ते तपासण्याचे आवाहनही सावंतांनी केले. आणि कोस्टल रोड, मुंबई पूर्व किनारा, रेस कोर्स हे संकल्प उद्धव ठाकरेंमुळे पूर्ण होत आहेत, असेही ते म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT