PM Modi File Photo
राष्ट्रीय

Cockroach Janta Party: सुशिक्षित तरुण नक्षलवादी कसे? हा तर अहंकार; 'दिमागी नक्षल' वक्तव्यावरून CJP ची PM मोदींवर जोरदार टीका

स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वापरलेल्या 'दिमागी नक्षल' या शब्दावरून दास यांनी त्यांच्यावर टीका केली आहे.

मोहन कारंडे

Cockroach Janta Party

नवी दिल्ली: सरकारवर प्रश्न उपस्थित करणाऱ्या तरुणांना 'नक्षलवादी' ठरवू नये, धोक्याची घंटा वाजली आहे. जनजागृतीची लाट आली आहे. जनताच आता जुने, भ्रष्ट, अकार्यक्षम आणि अहंकारी लोकांना सत्तेतून बाहेर काढतील, असा इशारा 'कॉकरोच जनता पार्टी'चे मुख्य प्रवक्ते सौरव दास यांनी दिला आहे. स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वापरलेल्या 'दिमागी नक्षल' या शब्दावरून दास यांनी त्यांच्यावर टीका केली आहे.

पंतप्रधान मोदी काय म्हणाले होते?

भारताच्या ८० व्या स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, जंगलांमधील सशस्त्र नक्षलवाद्यांना संपवण्यात सरकार यशस्वी झाले आहे. सशस्त्र नक्षलवादी नाहीसे झाले असले, तरी बौद्धिक नक्षलवादी संधींच्या शोधात आहेत. ते हिंसाचार आणि अराजकता भडकवण्याचे मार्ग शोधत आहेत. समाजाची दिशाभूल करण्यासाठी ते विविध डावपेचांचा अवलंब करत आहेत. या बौद्धिक नक्षलवाद्यांना ओळखले पाहिजे. या बौद्धिक नक्षलवाद्यांना वेगळे पाडले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.

सुशिक्षित तरुणांना नक्षलवादी कसे म्हणू शकता?

पंतप्रधान मोदींच्या या वक्तव्यानंतर दास यांनी 'एक्स' वर केलेल्या पोस्टमध्ये लिहिले की, "'दिमागी नक्षल' किंवा इतर कोणत्याही गोष्टी आता चालणार नाहीत. केवळ तुमच्या सरकारवर प्रश्न विचारतात म्हणून तुम्ही सुशिक्षित तरुणांना नक्षलवादी कसे म्हणू शकता? हा निव्वळ अहंकार आहे. तरूणांच्या समस्या सोडवण्यात आलेले पूर्ण अपयश आहे," असे दास यांनी म्हटले आहे. "धोक्याची घंटा वाजली आहे. जनजागृतीची लाट आली आहे" असेही दास म्हणाले.

स्वातंत्र्यदिनाच्या आणखी एका संदेशात दास म्हणाले की, " १२ वर्षांनंतर देश हा दिवस खऱ्या अर्थाने साजरा करत आहे. आपल्यातील एक गोष्ट अखेर मुक्त झाली आहे, ती म्हणजे भीती. ज्या पिढीला गप्प राहण्यास सांगितले गेले होते, त्या पिढीला आता स्वतःचा आवाज सापडला आहे. तसेच ज्यांना काहीच बदलणार नाही, असे सांगितले गेले होते, त्यांचा विश्वास पुन्हा जागृत झाला आहे. जागृतीचे युग सुरू झाले आहे. शांततापूर्ण आंदोलनाचे युग सुरू झाले आहे," असे दास म्हणाले.

लोकच आता जुने, भ्रष्ट, अकार्यक्षम आणि अहंकारी लोकांना सत्तेतून बाहेर काढतील. देशातील प्रत्येक जिल्ह्यात एक 'जंतर-मंतर' आकारास येत आहे, असा दावाही दास यांनी केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT