CJP Protest New Delhi नवी दिल्ली निवडणूक आयोगाचे आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात कॉकरोच जनता पार्टीचे आंदोलन झाले. या आंदोलनात सहभागी होणाऱ्या एका आंदोलकाला ताब्यात घेण्यासाठी पहाटे पोहोचलेल्या पोलिसांवर स्वतःच अडकून पडण्याची वेळ आल्याची घटना हरियाणामधील दिल्ली सिमेवरील रोहतक जिल्ह्यातील काबुलपूर गावात घडली आहे. जिल्हा परिषद सदस्य जय देव डागर यांना ताब्यात घेण्यासाठी गेलेल्या पोलिसांना सुमारे ५०० गावकऱ्यांनी घेराव घालून रोखून धरले.
या बाबत अधिक माहिती अशी की शनिवारी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास शिवाजी कॉलनी पोलीस ठाण्याचे ऑफिसर राकेश कुमार यांच्या नेतृत्वाखालील पथक रोहतक जिल्ह्यातील काबुलपूर गावात पोहोचले. दिल्लीतील जंतरमंतर येथे होणाऱ्या आंदोलनात सहभागी होण्यापासून रोखण्यासाठी पोलीस रोहतकमधील जिल्हा परिषद सदस्य जय देव डागर यांच्या घरी त्यांना ताब्यात घेण्यासाठी गेले होते. त्यावेळी घरातील बहुतांश सदस्य झोपलेले होते.
काही फोन कॉल्स आणि ५०० गावकऱ्यांचा पहारा
पोलिस आल्याचे पाहून जयदीप डागर यांनी पोलिसांशी कोणताही वाद न घालता डागर यांनी काही फोन केले. अवघ्या काही मिनिटांतच गावकरी घराबाहेर जमायला लागले आणि बघता बघता सुमारे ५०० ग्रामस्थांनी घराला वेढा घातला. गावकऱ्यांनी पोलिसांना स्पष्ट शब्दांत सांगितले की, डागर यांना कुठेही नेऊ दिले जाणार नाही. रोहतकहून वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी येऊन कारवाईचे ठोस कारण स्पष्ट करत नाहीत, तोपर्यंत पोलीसच नजरकैदेत राहतील, अशी भूमिका गावकऱ्यांनी घेतली. या घटनेचा व्हिडिओ 'X' (पूर्वीचे ट्विटर) वर शेअर केला गेला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. दुपारी १ च्या दरम्यान या प्रकरणावर पडदा पडला व पोलिसांना मोकळे केले गेले.
"आंदोलनात सहभागी होणे माझा लोकशाही अधिकार"
या घडामोडींनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना डागर यांनी स्पष्ट केले की, त्यांचा कोणत्याही राजकीय पक्षाशी थेट संबंध नसून ते नेहमी न्यायासाठी उभे राहतात. "निवडणूक प्रक्रियेत फेरफार करून मतदान करणे हा सध्या देशातील गंभीर मुद्दा बनला आहे. सत्ताधारी भाजपच्या फायद्यासाठी निवडणूक आयोग वैध मतदारांची नावे वगळण्यासाठी SIR चा वापर करत असल्याचा संशय लोकांमध्ये आहे. त्यामुळेच मी जंतरमंतरवरील आंदोलनात सहभागी होण्याची घोषणा केली होती. आंदोलनात भाग घेणे हा माझा लोकशाही अधिकार आहे," अशी भूमिका डागर यांनी यावेळी मांडली.